‘खडकवासला’तील गाळ काढल्याने पुणेकरांना लाभ : पाणीसाठा वाढला

‘खडकवासला’तील गाळ काढल्याने पुणेकरांना लाभ : पाणीसाठा वाढला

खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या 20 वर्षांपासून ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी सेवाभावी संस्था व लोकसहभागातून खडतर परिश्रम घेत खडकवासला धरणातून शेकडो टन गाळ बाहेर काढला. यामुळे ऐन उन्हाळ्यात तीव्र टंचाईच्या काळात पुणेकरांसह शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. गाळ काढण्यात आल्याने खडकवासला धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची भर पडली. याबाबत जलसंपदा विभाग तसेच जलतज्ज्ञांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे.
खडकवासला धरणात 2004 मध्ये कर्नल सुरेश पाटील यांनी गाळ काढण्याचे काम सुरू केले. खडकवासला ते डीआयडी, गोर्‍हे बुद्रुकच्या धरणतीरावरील ओसाड माळरानावर गाळ मातीचा भराव टाकून वनीकरण करण्यात आले. गेल्या पंधरा ते वीस वर्षांत जवळपास शंभर एकर पडीक जमीन वनीकरण व उद्यानाने फुलली आहे. खडकवासला धरण पुनर्जीवन चळवळीचे कार्यकर्ते कैलास गायकवाड, रवींद्र कडू, अविनाश चिकणे, नितीन जावळकर, संजय लहाने, राजू मत्तगी आदींच्या देखरेखीखाली वृक्षारोपण, गार्डन, वनऔषधी लागवड आदी कामे सुरू आहेत.
धरणातील गाळाचा परिसरातील शेतीला फायदा
गेल्या पंधरा वर्षांत वेल्हे, हवेलीसह जिल्ह्यातील जवळपास तीन हजारांहून अधिक स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतात खडकवासला धरणातून काढलेला गाळ, माती मोफत टाकण्यात आली आहे. त्यामुळे कुरण बुद्रुक, जांभली सोनापूरपासून गोर्‍हे बुद्रुकपर्यंतच्या दलदलीच्या जमिनीवर शेतकर्‍यांनी शेती, फळबागा, भाजीपाला अशी पिके घेतली आहेत. अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
गाळ काढण्यात आल्याने खडकवासला धरणातील पाणी साठवण क्षमता वाढली. त्याचा लाभ शेतीसह पुणेकरांना होत आहे. गोर्‍हे खुर्द ते खानापूरपर्यंतच्या धरण क्षेत्रातून प्लास्टिकचा कचरा, राडारोडा काढून पात्र स्वच्छ करण्यात आले. धरणतीरावर खानापूर ते शांतीवनपर्यंत चार किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करण्यात आला आहे, त्यामुळे शेतकर्‍यांची सोय झाली आहे.
– कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थंब संस्था.
खडकवासलातून काढलेल्या गाळामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. धरण परिसरात वनराई, गार्डन, दशक्रिया घाट आदी विधायक उपक्रम राबविले आहेत. स्थानिक शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. धरणाच्या ओसाड तीरावर घनदाट वनराई फुलली आहे. वन्यप्राण्यांसह पक्ष्यांचा अधिवास वाढल्यामुळे नवीन पर्यटनस्थळ विकसित झाले आहे.
– शरद जावळकर, माजी सरपंच, खानापूर

गाळमुक्त धरण अभियान देशभर राबविण्याची गरज
यंदा कडकडीत उन्हाळ्यातही खडकवासला धरणात मुबलक पाणी आहे. देशातील बहुसंख्य धरणे गाळाने भरली आहेत. त्यामुळे पहिल्या पावसात अनेक धरणांत शंभर टक्के पाणीसाठा होतो. उन्हाळा सुरू होताच धरणात पाण्याऐवजी गाळांचे तांडेच शिल्लक राहतात. धरणे गाळाने भरल्याने देशासमोर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण अभियान देशभरात थांबविण्याची गरज आहे, असे कर्नल सुरेश पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा

Nashik Water Shortage | देवळा तालुक्यात ६० हजार‎ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची झळ
हडपसर परिसरात धोकादायक होर्डिंग; नागरिकांची कारवाईची मागणी
11th Admission | अकरावीसाठी ५ जूनपासून ऑप्शन फॉर्म