विश्रांतवाडीत ‘स्काय वॉक’ काढण्यास सुरुवात..
विश्रांतवाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा : विश्रांतवाडी चौकात सुमारे दहा वर्षांपूर्वी पादचार्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल (स्काय वॉक) उभारला होता. मात्र, विविध कारणांमुळे त्याचा वापर होत नव्हता. या चौकात आता ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने ‘स्काय वॉक’ काढण्यात येत आहेत. मात्र, त्याचे सुटे केलेले भाग (सांगाडे) आळंदी मुख्य रस्ता व टिंगरेनगरकडे जाणार्या रस्त्यावर ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
‘स्काय वॉक’चा धानोरी रस्त्याकडील व विश्रांतवाडी पोलिस चौकीकडील भाग काढून टाकण्यात आला आहे. फक्त महालक्ष्मी बिहारच्या बाजूचा भाग काढणे बाकी आहे. सुटे केलेले जिन्याचे व इतर भाग टिंगरेनगरकडे व पुण्याकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर ठेवले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उर्वरित भाग तातडीने काढून टाकून रस्ता वाहतुकीला मोकळा करण्यात यावा. तसेच रस्त्यावर ठेवलेले सुटे भाग तातडीने हलविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
इंग्रजी ‘वाय’ (ू) आकाराच्या ‘स्काय वॉक’चा काही भाग येथील प्रतीकनगर चौकातील नानासाहेब परुळेकर शाळेजवळ व उर्वरित भाग शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतीगृह व मैदान यांना जोडण्यासाठी स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
असून अडचण, नसून खोळंबा…
या ‘स्काय वॉक’चा उभारणीपासून म्हणावा तसा उपयोग कधी झालाच नाही. येथे असणारी लिफ्ट तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा बंद असायची. पायर्या व चालण्याचा विचार केला असता, ‘स्काय वॉक’चा वापर न करता रस्ता ओलांडणे अधिक सोयीचे होते. त्यामुळे नागरिक धोका पत्करून रस्ता ओलांडत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळत होते.
‘स्काय वॉक’चा 60 टक्क्यांहून अधिक भाग काढण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित भाग काढून येथून हलविण्यात येईल. प्रतीकनगर व शिवाजीनगर येथे या ‘स्काय वॉक’चा उपयोग करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी विद्यालयाला त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे.
-श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (प्रकल्प), महापालिका
हेही वाचा
प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवून आणत होती एअर होस्टेस; तपासणीत उघड, अधिकारी थक्क
दापसरे-कुर्तवडीला माडासह वनौषधींचे वरदान; शिवकालीन ठेवा जतन
यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दीवर अंकुश; काय आहे नियोजन?