अमुदान स्फोट प्रकरण : संघर्ष समितीकडून नुकसान भरपाईची मागणी
डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत गुरूवारी 23 मे रोजी झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटात अनेकांचे बळी गेले. तर कित्येकांचे निवारे उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घटनास्थळी भेट दिलीच, शिवाय पोलिसांसह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचे निवेदनही दिले.
संघर्ष समितीचे गंगाराम शेलार यांच्या नेतृत्वाखाली गुलाबराव वझे, गजानन मांगरुळकर, भास्कर पाटील, एकनाथ पाटील, दत्तात्रय वझे, बाळाराम ठाकुर, रतन पाटील, रमाकांत पाटील, बुधाशेठ वझे, बंडू पाटील, जालंदर पाटील, जितेंद्र ठाकुर, वासुदेव पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर माळी, लक्षण पाटील, संदिप म्हात्रे, बाळकृष्ण जोशी, मुकुंद म्हात्रे, अजय म्हात्रे, अभिमन्यू म्हात्रे, अमित वझे, सोनू संते, विनोद पाटील, विनोद म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिस आणि एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या कामगारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसह ज्यांच्या घरांचे आतोनात नुकसान झाले त्यांनाही तातडीने मदत पुरविण्याची मागणी समितीने केली. डोंबिवली एमआयडीसीमध्ये जेवढ्या केमिकल आणि तत्सम धोकादायक कंपन्या आहेत त्या तातडीने स्थलांतरित करून त्यांच्या जागी इंजीनियरिंग अथवा आयटी क्षेत्रातील उद्योग सुरू करावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या भागात निवासी इमारती उभारण्यात येऊ नये, अशीही मागणी करण्यात आली. प्रदुषण नियंत्रण यंत्रणा, बॉयलर, रिॲक्टरचे इन्स्पेक्शन, ऑडिट आणि इतर सर्वच बाबतीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी समितीने केली.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
स्फोट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. एकूण परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्यक्ष दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधितांची भेट घेतली जाईल, असेही समितीने स्पष्ट केले.