UN पीसकीपर्स पुरस्कार पटकवणाऱ्या मेजर राधिका सेन आहेत कोण?

UN पीसकीपर्स पुरस्कार पटकवणाऱ्या मेजर राधिका सेन आहेत कोण?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : युनायटेड नेशन्स पीसकीपर्स दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांना प्रतिष्ठित लष्करी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. काँगोमध्ये UN शांतीरक्षक दलाचा भाग म्हणून त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि बहुमानाची बाब असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय अधिकारी ठरल्या आहेत.
भारतीय लष्करातील मेजर राधिका सेन यांनी ‘युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्टॅबिलायझेशन मिशन इन द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो’मध्ये काम केले. त्यांना आज (दि. 30) आंतरराष्ट्रीय UN शांती सुरक्षा दिनानिमित्त UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘2023 युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
असा सन्मान मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय अधिकारी
मेजर सेन यांनी पीटीआयला सांगितले की, केवळ माझ्या संघाचेच नव्हे तर माझे सर्व आदरणीय सहकारी, मोनुस्कोचे शांतीरक्षक आणि विशेषत: यांचे मी आभार मानते, माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पुढे त्या म्हणाल्या, ”एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची भावना शब्दात सांगता येणार नाही.”
मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणाऱ्या मेजर सेन या दुसऱ्या भारतीय शांतीरक्षक आहेत. मेजर गवानी यांनी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम केले होते. त्यांना 2019 साली त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. UNने दिलेल्या माहितीनुसार, मेजर सेन या मार्च 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत भारतीय रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनचे कमांडर म्हणून काँगो प्रजासत्ताकच्या पूर्वेला तैनात होत्या.
मेजर सेन यांनी भारतीय दूतावासात संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांचीही भेट घेतली. “मेजर राधिका सेन यांना त्यांच्या काँगोमधील उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित केले जाईल,” असे भारतीय कंबोज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोण आहेत राधिका सेन?
मेजर सेन यांचा जन्म 1993 साली हिमाचल प्रदेशमध्ये झाला. त्या आठ वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाल्या. त्यांनी बायोटेक इंजिनिअर म्हणून पदवी प्राप्त केली आहे. जेव्हा त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे येथे शिकत होत्या. मेजर सेन यांचे त्यांच्या सेवेबद्दल अभिनंदन करताना गुटेरेस म्हणाले की त्या एक “आदर्श आणि खऱ्या नेत्या” आहेत. त्यांची सेवा संपूर्ण संयुक्त राष्ट्रांसाठी योगदान आहे.”
मेजर सेन म्हणाल्या की, आजच्या जगात महिलांनी एकमेकांना साथ देणे आणि समाजात प्रचलित असलेल्या भेदभावाशी लढा देणे अत्यंत गरजेचे आहे. पुढे त्या म्हणाल्या, “त्याच वेळी, पुरुषांनी महिलांना पाठिंबा देणे खूप महत्वाचे आहे, महिलांचे नेतृत्व संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या महिलांमध्ये भारताचे मोठे योगदान आहे.

#IndinArmy | @adgpi officer, Major Radhika Sen awarded with the prestigious @UN #MilitaryGenderAdvocate of the Year Award for the year 2023 pic.twitter.com/KbGNVqre31
— DD News (@DDNewslive) May 30, 2024