इंडिया आघाडी ४८ तासांत पंतप्रधान निवडणार : जयराम रमेश
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : इंडिया आघाडीची सत्ता आल्यास ४८ तासांत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड केली जाईल, असा दावा काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.
ते म्हणाले की, या निवडणुकीत २००४ सारखी परिस्थिती निर्माण होईल. काँग्रेस आणि इंडिया आघाडी अनेक राज्यांमध्ये चमकदार कामगिरी करणार आहे. काँग्रेसला राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रात मोठा फायदा होईल. याशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आसाममध्येही पक्षाची स्थिती सुधारेल.
इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर इंडिया आघाडीकडून ४८ तासांच्या आत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची निवड केली जाईल. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्या पक्षाचे नेते इंडिया आघाडी सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले.