दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू; एक गंभीर
करमाळा; Bharat Live News Media वृत्तसेवा : अहमदनगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर करमाळा जेऊर रस्त्यावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. साहेबराव उर्फ सायबू महादेव दुर्गुळे (वय ६२) व सय्यद कासम मदारी( वय ७०,रा.मौलाली, माळ करमाळा ) असे मयत झालेल्याची नावे असून कल्पना साहेबराव दुर्गुळे असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, साहेबराव दुर्गुळे हे आपल्या पत्नी कल्पना सह करमाळ्याहून कुंभेज येथे पाहुण्याकडे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून बुधवारी (दि.29) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करमळ्याकडे येत असताना कुमभेज ते झरे या मार्गावर त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. यामध्ये सायबू यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी कल्पना दुर्गुळे या गंभीर जखमी झाल्या. त्या दोघांनाही करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता साहेबराव दुर्गुळे यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अन्य दुसऱ्या घटनेत आज सायंकाळी (दि.29) चार वाजण्याच्या सुमारास मौलाली माळ येथे सय्यद कासम मदारी हे रस्ता ओलांडत असताना त्यांना वेगाने येणाऱ्या कार नंबर एमएच बेचाळीस बी ६४२१ ने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा म यावेळेस ते गंभीर जखमी होऊन गतप्राण झाले. त्यांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. या दोन्ही घटना करमाळा जेऊर रस्त्यावर घडल्या आहेत. मयत साहेबराव दुर्गुळे हे करमळा येथील न्यायालयात ॲड. एम एन कटारे यांचे कारकुन म्हणून काम पाहत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.