नागपुरमध्ये ४८ तासात उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू
नागपूर; राजेंद्र उट्टलवार : विदर्भात नवतपाच्या शेवटच्या टप्प्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसात म्हणजे ४८ तासात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस उन्हात जाऊ नका, जाणार असल्यास पुरेशी खबरदारी घ्या, असा सल्ला डॉक्टर, प्रशासन आणि हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारी नागपुरात ४५.२ अंश सेल्सिअस अशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. या आठवड्यात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४६.७ नोंदवण्यात आले. बुलढाणा (३८.२) वगळता विदर्भात इतर जिल्ह्यातील तापमान हे ४० ते ४५ अंशांवर धडकले आहे.
बुधवारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी उड्डाणपुलाखाली एक ३० वर्षीय युवक बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुसरी घटना अजनी हद्दीतील शताब्दी चौकात पुढे आली. ४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. सकाळी दहा वाजताच्या सुमारात धंतोलीतील जनता चौकातील मेहाडीया भवनजवळ ५० वर्षीय इसम बेशुद्धावस्थेत आढळला. याशिवाय कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळमना बाजारात ५० वर्षीत इसम बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने त्याला पोलिसांनी मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदरमधील इस्तंबूल हॉटेल समोर ६५ वर्ष वयाचा जेष्ठ नागरिक मृत अवस्थेत आढळला. तर पाचपावलीतील यशोदीप कॉलनी भागात ५० वर्षे वयाचा इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मेयोमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केले. अद्याप या सहाही मृतांची ओळख पटलेली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा :
टंचाईची धग: कळवण-लघुपाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक; हातपंप मृत
पाण्यासाठी संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा