अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरायचा कधी? शिक्षण विभागाचे ढिसाळ नियोजन

अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरायचा कधी? शिक्षण विभागाचे ढिसाळ नियोजन

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर 24 मेपासून अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाली, तर दहावीचा निकाल लागल्यानंतर त्याच दिवशी भाग दोन भरण्याची संधी देण्यात येणार होती. प्रत्यक्षात निकाल लागून तीन दिवस झाले, तरी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे ढिसाळ नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांसाठी अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोनमध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे असतात. दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत 44 हजार 151 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली, तर 26 हजार 218 विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरून अर्ज लॉक केला आहे. त्यापैकी 11 हजार 982 विद्यार्थ्यांनी अर्जाची स्वयंपडताळणी करून घेतली आहे, तर सुविधा केंद्रांच्या माध्यमातून 9 हजार 962 विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अर्जाचा भाग दोन भरण्याचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात मात्र भाग दोन भरण्याची सुरुवात झालेली नाही. तसेच पुढील दोन ते तीन दिवस विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे अत्यंत ढिसाळ नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा

नसरापूर रस्ते कामाला मुहूर्त मिळेना; अधिकार्‍यांचा वेळकाढूपणा
आरटीई प्रवेशाची लॉटरी 10 जूनला
‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर