यात्रा, जत्रा, उत्सवात निवडणुकीचीच चर्चा! उमेदवार, कार्यकर्तेच नव्हे; तर मतदारांची उत्कंठा शिगेला

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडून मतदान झाले. मात्र, हे मतदान कोणाला झाले, उमेदवार आमच्या गावातच आला नाही, गावातील नेता मॅनेज झाला, हाच उमेदवार येणार, यावरून राजकीय चर्चेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदान झाल्यानंतर गावोगावच्या जत्रा, यात्रा, उत्सव व लग्नसोहळे अजूनही सुरू असल्याने या कार्यक्रमांत देखील नेतेमंडळी हीच चर्चा करीत असल्याने उमेदवारांसह …

यात्रा, जत्रा, उत्सवात निवडणुकीचीच चर्चा! उमेदवार, कार्यकर्तेच नव्हे; तर मतदारांची उत्कंठा शिगेला

संतोष वळसे पाटील

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडून मतदान झाले. मात्र, हे मतदान कोणाला झाले, उमेदवार आमच्या गावातच आला नाही, गावातील नेता मॅनेज झाला, हाच उमेदवार येणार, यावरून राजकीय चर्चेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदान झाल्यानंतर गावोगावच्या जत्रा, यात्रा, उत्सव व लग्नसोहळे अजूनही सुरू असल्याने या कार्यक्रमांत देखील नेतेमंडळी हीच चर्चा करीत असल्याने उमेदवारांसह नेत्यांची विजयाबाबत उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
यंदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पुणे जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यांच्या उमेदवाराने गावोगावी जाऊन प्रचार केला. जिल्ह्यात ग्रामीण भागातील गावोगावीच्या यात्रा, जत्रा, उत्सव सुरू झाले असल्याने त्यानिमित्त बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचे आखाडे, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांना उमेदवार, नेतेमंडळी भेट देत राजकीय विषयाला धरूनच भाषण करीत आहेत, तर गावोगावी लग्नाचा हंगाम सुरू असल्याने नेतेमंडळी तेथे भेटल्यावर कार्यकर्त्यांकडून आपल्याला किती मतदान होईल, मतदानाची टक्केवारी कशी घटली, यावर चर्चा करून आपण कसे विजयी होऊ, याचे गणित मांडत आहेत.
नेते, उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकाच वेळी अनेक कार्यक्रमांना जाणे शक्य नसले, तरी त्यांचे कार्यकर्ते देखील कार्यक्रमांना हजेरी लावत मतदानावर चर्चा करीत आहेत. एकाच ठिकाणी मतदारांचा जनसमुदाय जमत असल्याने यात्रा, जत्रा व लग्नकार्याला आवर्जून भेट देण्यावर जोर आहे. अनेक नेतेमंडळी लग्न कार्यक्रमात वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी माईकचा ताबा घेत आपल्या उमेदवारासाठी मतदान प्रक्रियेतून सहकार्य केल्याचे सांगून एकप्रकारे आभार मानत आहेत. नेत्यांनी काय काम केले? आपला उमेदवार निवडून आल्यावर काय करू शकतो? याबाबत देखील माहिती दिली जात आहे.
रुसव्या-फुगव्यावर देखील चर्चा
एकाच दिवशी बर्‍याच गावांच्या जत्रा, लग्न असल्याने विविध पक्षांचे नेतेमंडळी आपापल्या पक्षांचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार, कोणी काम केले नाही, तो रुसला आहे, याबाबत चर्चा करीत आहेत.
हेही वाचा

अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित
जलसंपदा विभागाच्या जागेत होर्डिंगरूपी यमराज..!
पीएमपी-चारचाकीचालकाचा रस्त्यातच ‘राडा’; फर्ग्युसन रस्त्यावरील घटना