Hoarding News : डोक्यावर होर्डिंगची टांगती तलवार..!

Hoarding News : डोक्यावर होर्डिंगची टांगती तलवार..!

राजगुरुनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : घाटकोपर येथील होर्डिंग्ज कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यात सर्वच ठिकाणच्या अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा उपस्थित झाला आहे. खेड तालुक्यात देखील अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंगची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खेड तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गासह विविध रस्त्यांवर, शहर तसेच मोठ्या गावांच्या चौकात मोठमोठी होर्डिंग आहेत. या होर्डिंगलगत घरे, वस्ती विखुरलेली आहे. सावलीसाठी किंवा वादळवार्‍याच्या प्रसंगी अनेक मार्गस्थ या होर्डिंगचा आडोसा म्हणून आधार घेतात. मात्र, सर्रास ही होर्डिंग अतिशय तकलादू स्वरूपात उभी केलेली पाहायला मिळत आहेत.
घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील अशा होर्डिंगबाबत प्रशासन काही ठोस भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही बहुतांश होर्डिंग अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे. विशेषकरून पुणे-नाशिक महामार्गालगत अशी अनेक होर्डिंग आहेत. हॉटेल, ढाब्यांच्या जाहिरातीसाठी उंच उभारणी केलेली ही होर्डिंग नैसर्गिक आपत्तीत कधीही जीवघेणी ठरू शकतात.
रस्त्याच्या कडेला किंवा दर्शनी भागात असल्याने जागामालक केवळ भाड्याचे पैसे मिळविण्यासाठी हा राक्षस स्वतःच उभा करून ठेवल्याचे दिसून येत आहे.
चाकण, राजगुरुनगर नगरपरिषद, संबंधित ग्रामपंचायत यांना होर्डिंग उभारताना विचारात घेतले जात नाही. त्यामुळे सर्रासपणे तालुक्यातील विविध भागांत अनियमित होर्डिंगची उभारणी केलेली आहे. गेली काही वर्षे ही होर्डिंग उभी असून, त्यांचा मूळ पाया खिळखिळा झाला आहे. बहुतेक होर्डिंग लोखंडाचा वापर करून उभारली आहेत. त्यांचे सापळे गंजलेले, तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेकांचा उंचीवर मोठा डोलारा आहे. मात्र, तुलनेने ताकदीचा सांगाडा नाही. या सर्वच धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा

कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलली
अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित
जलसंपदा विभागाच्या जागेत होर्डिंगरूपी यमराज..!