Loksabha election | काकासाहेब – मंत्री, कुलगुरू अन संमेलनाध्यक्षही..

‘दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा’, ही ओळ छाती फुगवून मराठीजन जशी म्हणतात, तशीच उज्ज्वल, देदीप्यमान, देशावर ठसा उमटवणारी कामगिरी पुण्याने दिल्लीच्या राजकारणात केली असून, पुण्यात आत्तापर्यंत झालेल्या अठरा लोकसभा सदस्यांची ही परंपरा कायम राखण्याची जबाबदारी चार जूनला निवडून येणार्‍या एकोणिसाव्या खासदाराला करावी लागणार आहे. पुण्याच्या खासदारांच्या कामगिरीचा धावता आढावा खास ‘पुढारी’च्या वाचकांसाठी आजपासून घेतो आहोत. …

Loksabha election | काकासाहेब – मंत्री, कुलगुरू अन संमेलनाध्यक्षही..

सुनील माळी

‘दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा’, ही ओळ छाती फुगवून मराठीजन जशी म्हणतात, तशीच उज्ज्वल, देदीप्यमान, देशावर ठसा उमटवणारी कामगिरी पुण्याने दिल्लीच्या राजकारणात केली असून, पुण्यात आत्तापर्यंत झालेल्या अठरा लोकसभा सदस्यांची ही परंपरा कायम राखण्याची जबाबदारी चार जूनला निवडून येणार्‍या एकोणिसाव्या खासदाराला करावी लागणार आहे. पुण्याच्या खासदारांच्या कामगिरीचा धावता आढावा खास ‘Bharat Live News Media’च्या वाचकांसाठी आजपासून घेतो आहोत.
स्वातंत्र्यानंतर आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत अनेक मंत्री झाले, पण खुद्द ब्रिटिशांच्या राजवटीत मंत्रिपदाचा मान मिळवलेल्या मोजक्या भारतीयांमध्ये होते पुण्याचे काकासाहेब गाडगीळ… नंतर पहिली निवडणूक होईपर्यंतच्या पाच वर्षांमधील पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातही त्यांचा केवळ समावेशच झाला नाही, तर त्यांनी पाकिस्तानच्या युद्धासाठी सीमेवर रस्तेबांधणी करण्याच्या तसेच भाक्रा-कोयना-हिराकुड धरणबांधणीच्या कामात मोलाचे योगदानही दिले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशी दुहेरी पदे भूषवण्याचा मान मिळवणारे ते पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील एकमेव खासदार होते.
पुण्याला लाभलेले पहिले खासदार नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांनी पद मिळण्याआधीपासून देशसेवेला सुरुवात केली. स्वातंत्र्यासाठी लढा देणार्‍या या देशभक्ताला एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली आणि प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली. त्यांच्या कामामुळेच त्यांना 1934 ते 1937 या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात घेण्यात आले. स्वातंत्र्य मिळाले 1947 ला आणि लोकसभेची पहिली निवडणूक झाली 1952 मध्ये. या पाच वर्षांच्या काळात पंडित नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून कारभार केला. त्या मंत्रिमंडळात काकासाहेबांना सन्मानाने घेण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम, खाण आणि ऊर्जा या खात्यांचा कारभार करीत असताना त्यांनी 1947 च्या पाकिस्तान युद्धाचा भाग म्हणून पठाणकोट ते जम्मू मार्गे काश्मीरमधील श्रीनगर असा लष्करी-कॅलिबर रस्ता तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. तसेच त्यांनी भाक्रा, कोयना आणि हिराकुड या धरण प्रकल्पांची सुरुवात केली. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वाची पदे पुण्याच्या या खासदाराने भूषवली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून 1937 ते 1945 या काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने त्यांना देशपातळीवरील काम देताना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद 1952 ते 1954 या काळात. पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांना केंद्र सरकारने 1958 मध्ये पाठवले आणि त्यांनी त्या पदावर 1962 पर्यंत काम केले. म्हणजेच सरहद्दीपर्यंतची जबाबदारी पुणेकर कुशलतेने सांभाळत होते. काकासाहेबांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असताना दिल्लीतील चाणक्यपुरी, शांतिपथ अशी भारतीय नावे दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लावण्याचे महत्त्वाचे काम काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे यांनी केले. शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षाचा जनाधार असलेला बहुजन समाज काँग्रेसकडे वळवण्याचे काम जेधे-गाडगीळ यांनी केले. त्यामुळे शे. का. पक्ष आणि समाजवादी पक्षाला उतरती कळा लागली. काकासाहेब हे उत्तम साहित्यिकही होते आणि त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास या विषयांबरोबरच ललित लेखनही केले असून त्यांचे प्रमुख पंचवीस ग्रंथ आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे 1943 मधील पुस्तक चाणक्याच्या अर्थशास्त्राची सोप्या मराठीत माहिती देणारा उल्लेखनीय ग्रंथ आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे. त्यामुळेच सातार्‍यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली. काकासाहेब जेव्हा पंजाबचे राज्यपाल झाले तेव्हा ते गुरूमुखी शिकले आणि गुरू ग्रंथसाहिबचे मराठीत भाषांतर केले.
महाराष्ट्र गीतात महाराष्ट्राचे वर्णन देशगौरवासाठी झिजला, असे करण्यात आले आहे, त्याप्रमाणे काकासाहेबांनी देशगौरवासाठी कष्ट केलेच, पण ज्या पुण्यातून आपण खासदार झालो, त्या पुणे मतदारसंघाला आणि पुणेकरांना ते विसरले नाहीत. पुण्याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए हे पुण्याचे भूषण आहे. ते पुण्यात आणले ते काकासाहेबांनी. एनडीए दक्षिण भारतात न्यायची ठरली होती, पण ती देशाच्या मध्यवर्ती भागात असावी, असे लष्करी अधिकार्‍यांचे मत होते. त्यांना पाणी, डोंगर एकाच भागात असेल, असे ठिकाण हवे होते. अशा ठिकाणांच्या यादीत पुणे होते. त्यामुळे काकासाहेबांनी पंडित नेहरूंचे मन वळवले.
ज्या खोर्‍यांतून शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले, ज्या भागात देशाचे रक्षणकर्ते तयार होतात, ती जागा एनडीएला योग्य असे काकासाहेबांनी सांगितले, गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी त्याला पाठिंबा दिला आणि एनडीए पुण्यात आली. त्याच पद्धतीने काकासाहेबांनी हिंदुस्थान अँटिबायोटिक्स हा सरकारी औषधनिर्मितीचा प्रकल्पही पुण्यात आणण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली. काकासाहेब व्यासंगी असल्यानेच त्यांच्याकडे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी 1964 मध्ये सोपवण्यात आली. खासदार आणि कुलगुरू ही दोन्ही पदे सांभाळणारी देशातील बहुदा ही एकमेव व्यक्ती असावी.
हेही वाचा

राम नदी ‘मैली’! बिल्डरकडूनच सोडले जातेय सांडपाणी; ‘आप’चा आरोप
मतभेद विसरुन एका व्यासपीठावर या : शरदचंद्र पवार
कोल्हापूर : पूर नियंत्रणाचे गावनिहाय नियोजन करा