नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- जिल्ह्यात 100 हून अधिक शाखा व कार्यकर्त्यांचे बऱ्यापैकी जाळे असलेल्या माजी खासदार युवराज संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ संघटनेने अद्यापपर्यंत एकाही पक्षाला पाठिंबा देऊ केला नसल्याने, महायुती, महाविकास आघाडी, वंचितसह अपक्ष उमेदवार पाठिंब्यासाठी प्रयत्नशील आहेत. याउलट लोकसभेतून माघार घेणाऱ्या स्वराज्यकडून आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. ज्या पक्षाशी विधानसभेचे सूत्र जुळणार, त्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंब्याच्या निर्णयाबतचा विचारविनिमय संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (Lok Sabha Election 2024)
संभाजीराजे काय निर्णय घेणार?
नाशिक आणि दिंडोरीमध्ये दि. २० मे रोजी मतदान होत असून, स्वराज्यचा अद्याप कोणासही पाठिंबा नाही.
मविआ, महायुती, वंचित तसेच काही अपक्ष उमेदवार पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती आहे.
अशात संभाजीराजे काय निर्णय घेणार, याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
युवराज संभाजीराजे यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश न करता, ‘स्वराज्य’ या सामाजिक संघटनेची मुहूर्तमेढ दि. १२ मे २०२२ रोजी रोवली. शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर ही संघटना उभी केली. संघटनेचा राज्यभर विस्तार करण्यासाठी सुरुवातीच्या काळात चांगले प्रयत्न केले गेले. नाशिकमध्ये गाव तिथे शाखा याप्रमाणे संघटनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वर्षभरातच संघटनेत फूट पडल्याने, प्रमुख पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला गेला. परिणामी, नाशिकमधील संघटनेची घडी काही प्रमाणात विस्कटली. सुरुवातीला युवराज संभाजीराजे नाशिकमधून खासदारकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा होती. त्यावेळी त्यांच्या नाशिकच्या सततच्या दौऱ्यांनी त्याबाबतचे संकेतही दिले होते. मात्र, संघटनेत फूट पडल्याने, त्यांचे दौरे कमी झाले व स्वराज्यचा नाशिकवरही दावाही दुरावत गेला. (Lok Sabha Election 2024)
जोपर्यंत आदेश येत नाहीत, तोपर्यंत पाठिंबा नाही
दरम्यान, युवराज संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमधून लोकसभेच्या रिंगणात असल्याने, संभाजीराजे यांनी लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेत, वडिलांच्या प्रचारासाठी स्वत:ला झोकून दिले. यावेळी प्रचारात स्वराज्यचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यावेळी संभाजीराजे यांनी दि. ७ मे रोजी कोल्हापूर मतदारसंघाचे मतदान संपल्यानंतर, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत संघटनेच्या पाठिंब्याचा निर्णय दि. ८ मे रोजी घेणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत, जोपर्यंत आदेश येत नाहीत, तोपर्यंत कोणासही पाठिंबा नसल्याचे कार्यकर्त्यांना कळविले होते.
आठ मतदारसंघांत तयारी (Lok Sabha Election 2024)
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वराज्यकडून शहरातील नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळाली या मतदारसंघांत उमेदवार उभे केले जाणार आहे. याव्यतिरिक्त सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण या मतदारसंघांत स्वराज्य उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
स्वराज्य संघटनेने अद्याप कोणत्याही उमेदवारास पाठिंबा दिलेला नसून, ज्याच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, अशाच उमेदवाराच्या पाठीशी संघटना उभी राहणार आहे. तसेच संघटना पूर्ण ताकदीनिशी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. –
केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्रप्रमुख, स्वराज्य
हेही वाचा –
अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान; घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडाले, भाजीपाला, फळबागांना फटका
Happy Birthday Madhuri Dixit : वडिलांची इच्छा होती, ‘माधुरीने डॉक्टर व्हावं’, पण ती कशी बनली ‘धकधक गर्ल’
सोलापूर : मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू