Loksabha election | जुन्नरच्या गडात कोणाला मताधिक्य?

Loksabha election | जुन्नरच्या गडात कोणाला मताधिक्य?

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये ही लढत तुल्यबळ झाली. यातील कोणाला जुन्नर तालुक्यातून आघाडी मिळेल याबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जुन्नरमधून मताधिक्य मिळावे यासाठी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील असल्याने तसेच त्यांच्या सोबतीला ज्येष्ठ नेते शरद पवार असल्याने कोल्हे यांना आढळराव यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळू शकते, असा अंदाज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
मागील निवडणुकीत कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मताधिक्य मिळाले होते. या वेळी त्यापेक्षा कमी मते मिळण्याची शक्यता काही जण व्यक्त करीत आहेत. कारण निवडूण गेल्यानंतर कोल्हे पाच वर्षांत मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत. तसेच 2019 ला ज्या लोकांनी वर्गणी काढून त्यांना लोकसभेला मदत केली त्यांचे आभार मानायला देखील कोल्हे मतदारसंघात गेले नव्हते, त्याचा फटका काही प्रमाणामध्ये कोल्हे यांना बसू शकतो असे काहींचे म्हणने आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची मदत कोल्हे यांना पथ्यावर पडू शकते. तथापि बेनके, सोनवणे, बुचके एकत्र असल्याने कोल्हे यांना रोखल जाऊ शकते, असे काही राजकीय जाणकारांचे म्हणने आहे.
आढळराव यांची उमेदवारी काहिशी उशिरा जाहीर झाली. त्यातुलनेत कोल्हे यांची उमेदवारी निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर सहा महिने झाली होती. त्यामुळे ते प्रचारात आघाडीवर राहिले. सोशल मीडियावर कोल्हेंनी चांगलीच बाजी मारली. त्यामानाने आढळराव सोशल मीडियावर कमी पडल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान अनेक गावांमध्ये महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार गेले नसल्याचा फटका दोघांनाही बसू शकतो. अर्थात दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात अधिक मतदान कसे होईल याचा प्रयत्न केला. खासदार अमोल कोल्हे यांनी कोपरे मांडवे हे गाव दत्तक घेतले होते.
परंतु, ते या गावाकडे फारसे फिरकले नाहीत. तेथील मोबाईल टॉवरचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. त्याचा फायदा त्यांना जरी होणार असला तरी कोपरे मांडवे परिसरातील वाड्यावरील पाण्याचा प्रश्न सोडवता न आल्याचा फटका कोल्हे यांना बसू शकतो. तसेच पंधरा वर्षे खासदार असताना आढळराव यांनीही या भागातील पाण्याचा प्रश्न का मार्गी लावला नाही? असाही प्रचार करण्यात आला. परंतु, आढळराव यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पाण्याचा टँकर सुरू केल्याने तेथील जनतेची सहानुभूती त्यांना मिळू शकते असे काहींचे म्हणने आहे.
या ठिकाणी अंकुश आमले व मोहित ढमाले यांनी आपली ताकद पणाला लावली होती. ओतूर – मढ बेल्ट कोणाच्या पाठीशी उभा राहील? यावर जुन्नर तालुक्याच्या मताधिक्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. दरम्यान, कोल्हे यांचे समर्थक जुन्नर तालुक्यातून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊ असे सांगत आहेत. काही उत्साहींनी कोल्हे विजयी झाले असे समजून नारायणगाव शहरांत फटाके फोडले. आढळराव यांचे समर्थक जुन्नर तालुक्यातून कोल्हे यांना मताधिक्य मिळणार नाही, यंदा जुन्नर तालुक्यातून कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळेल असे सांगत आहेत, अर्थात याबाबत 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत फक्त चर्चा आणि चर्चाच सुरू राहणार आहे.
हेही वाचा

पळसदेवला वादळी वार्‍याने 8 बगळ्यांचा मृत्यू, 12 जखमी
बारामतीतही बेकायदा होर्डिंग्जच्या विळख्यात; अनेक होर्डिंग्ज परवानगीविना
Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..