पळसदेवला वादळी वार्याने 8 बगळ्यांचा मृत्यू, 12 जखमी
पळसदेव : Bharat Live News Media वृत्तसेवा : पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात सोमवारी (दि. 13) रात्री झालेल्या वादळी वार्यासह पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, त्यामध्ये 50 हून अधिक राखी बगळे (ग्रे-हेरॉन) अडकून पडले होते. मात्र 8 बगळ्यांचा मृत्यू झाला, तर 12 बगळे जखमी झाले, यामध्ये पिल्लांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि मृत व जखमी बगळे ताब्यात घेत उपचार केले. पळसदेव येथील जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्यानजिकच्या उंच सुबाभळीच्या झाडावर शेकडो राखी बगळ्यांनी घरटी तयार केलेली आहेत. त्यामध्ये अनेक बगळ्यांनी पिल्लांना जन्म दिला आहे. काही पिल्ले उडण्याच्या अवस्थेत होती, तर काही अंड्यातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत होती.
मात्र सोमवारी रात्री साडेनऊ ते 10 वाजण्याच्या दरम्यान जोरदार वादळी वार्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामध्ये हे सुबाभळीचे झाड उन्मळून पडले आणि त्यामध्ये 50 पेक्षा अधिक बगळे अडकून पडले. यातील अनेक बगळ्यांना येथील स्थानिक पक्षीमित्रांनी झाडातून सुरक्षित काढले. मात्र 8 मोठे बगळे मृत्युमुखी पडले, तर इतर 12 बगळे गंभीर जखमी झाले. यामध्ये पिल्लांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती दैनिक ’Bharat Live News Media’चे वार्ताहर प्रवीण नगरे यांनी वन विभागाला दिली.
त्यानुसार वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सनी कांबळे, महादेव झोळ, केशव चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ दौंड येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. दरम्यान पोलिस पाटील अनिल कुचेकर, रमेश काळे, प्रताप काळे, बलभीम भोई, आबा गायकवाड, सोमनाथ भोई यांनी झाडांमध्ये अडकलेल्या अनेक बगळ्यांना बाहेर काढून त्यांना पाणी पाजून सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यानंतर दौंड येथील रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व सर्व बगळे ताब्यात घेतले व यातील जखमींवर प्राथमिक उपचार केले तर काहींना पुढील उपचारासाठी पुण्याला नेले.
हेही वाचा
अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान; घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडाले, भाजीपाला, फळबागांना फटका
बारामतीतही बेकायदा होर्डिंग्जच्या विळख्यात; अनेक होर्डिंग्ज परवानगीविना
Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..