Loksabha election | बारामतीबाबत संभ्रमच! कोणता मुद्दा ठरणार वरचढ?

Loksabha election | बारामतीबाबत संभ्रमच! कोणता मुद्दा ठरणार वरचढ?

राजेंद्र कवडे देशमुख

बावडा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे देशातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत जनतेने भावनिक लाटेला पसंती दिली की विकासाच्या मुद्द्याला उचलून धरले? याबाबत मतपेटीत मतदारांनी दिलेल्या संभाव्य कौलाबाबत राजकीय अभ्यासकही संभ्रमात पडलेले दिसून येत आहेत. मात्र, सध्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे ठामपणे केले जात आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चिली जात आहे. पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रथमच लोकसभेची निवडणूक होत असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीने दोन्ही बाजूंकडून लढविली गेली. ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डाव-प्रतिडाव या निवडणुकीत जनतेला पाहावयास मिळाले, तर काही गुप्त डाव आगामी काळात हळूहळू उघड होतील. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याकडून विकासाच्या घड्याळावर भर दिला जात होता, तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूला भावनिक लाटेतून तुतारीचा आवाज निघत होता. इंदापूर तालुक्यामध्ये 3 लाख 23 हजार 441 मतदारांपैकी 2 लाख 17 हजार 173 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. इंदापूर तालुक्याची मतदानाची टक्केवारी 67.12 एवढी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकाची राहिली. 8पान 2 वर
हिंदुत्वाच्या मुद्द्याला जनतेकडून बगल!
महायुतीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत मतदान झाल्याचे दिसून आले नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागात हिंदुत्वाचा मुद्दा चालत नसल्याचे अनेकांनी सांगितले. शिवाय प्रचारातही हिंदुत्वाचा, राम मंदिरनिर्मितीचा मुद्दा फारसा प्रचारात पुढे आला नाही. तरीही महायुतीच्या उमेदवारास अल्पसंख्याकांची फारशी मते न मिळाल्याचेही बोलले जात आहे.
गावनेत्यांपेक्षा जनतेची मानसिकता सरस !
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गावनेत्यांना फार मोठे महत्त्व असे. ’नेता बोले गाव चाले’ असे हमखास चित्र त्याकाळी दिसत असे. मात्र, आता प्रसिद्धिमाध्यमांमुळे जनता हुशार झाल्याने गावनेत्यांचे महत्त्व कमी होत चालल्याचे या निवडणुकीत दिसून आले. गावनेत्यांचे जनता ऐकतेच, असे राहिलेले नाही. निवडणुकांमध्ये जनतेची उमेदवाराविषयीची मानसिकता आता महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र, निवडणुकीत गावनेते हे प्रचार यंत्रणा राबविणे, मतदान घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे आहेतच. त्यामुळे आगामी काळात यातून उमेदवारांना सुवर्णमध्य काढावा लागणार आहे. एकंदरीत, निवडणुकांचे कंगोरे बदलत चालले आहेत, एवढे मात्र खरे आहे.
हेही वाचा

Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..
Facebook, Instagram down: फेसबुक-इन्स्टाग्राम पुन्हा ठप्प, जगभरातील युजर्स चिंतेत
धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने संपविले जीवन