बिजदची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी

ओडिशात यावेळी सर्वच मतदार संघांत तिरंगी लढती होत आहेत. खरा मुकाबला सत्तारूढ बिजू जनता दल आणि विरोधी भाजप यांच्यातच होत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी असे स्वरूप येथील राजकीय लढाईला आले आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये सत्तारूढ बिजदला भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसही सर्व जागा लढवत असून, त्यामुळे चुरस …

बिजदची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी

ओडिशात यावेळी सर्वच मतदार संघांत तिरंगी लढती होत आहेत. खरा मुकाबला सत्तारूढ बिजू जनता दल आणि विरोधी भाजप यांच्यातच होत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता विरुद्ध मोदींची गॅरंटी असे स्वरूप येथील राजकीय लढाईला आले आहे.
लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये सत्तारूढ बिजदला भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसही सर्व जागा लढवत असून, त्यामुळे चुरस वाढल्याचे दिसत आहे. प्रस्थापितविरोधी कौलाचा फायदा आपल्याला होईल, अशी भाजपची अटकळ आहे, तर कल्याणकारी योजनांच्या जोरावर आपणच पुन्हा बाजी मारू, असा विश्वास बिजदला वाटत आहे. काँग्रेसला येथे गमावण्यासारखे काहीही नाही. कारण, मजबूत पक्ष संघटनांच्या बळावर या राज्यात काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. पर्याय म्हणून ओडिशी जनता भाजपचा विचार काही प्रमाणात का होईना, करू लागली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता आणि मोदींची गॅरंटी यांच्यातील राजकीय युद्ध गडद होऊ लागले आहे.
पाचव्या टप्प्यात बारगड, सुंदरगड, बोलनगिर, कंधमल आणि अस्का, या पाच मतदार संघांत 20 मे रोजी मतदान होत आहे. लोकसभेच्या एकवीस जागा येथे असून, उरलेल्या बारा जागांसाठी अनुक्रमे 25 मे आणि एक जून रोजी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने येथे आठ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी ही संख्या आणखी वाढविण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या दहा वर्षांत या राज्यावर विशेष लक्ष देऊन तेथे भाजप गावागावात पोहोचवण्याची कामगिरी पार पाडली आहे. बिजदला गेल्या वेळी बारा जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी सर्व जागा जिंकून क्लीन स्वीप करण्याचा निर्धार मुख्यमंत्री पटनायक यांनी बोलून दाखविला आहे. काँग्रेसही आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची अपेक्षा बाळगून आहे. काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चाशी युती केली असून मयुरभंज येथून झामुमोच्या तिकिटावर अंजनी सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झारखंडप्रमाणेच या राज्यात आदिवासींचे प्रमाण लक्षणीय आहे. अनुसूचित जमातींचे प्रमाण 22 टक्के, अनुसूचित जातींचे प्रमाण 15 टक्के, ओबीसी 25 टक्के आणि अन्य 38 टक्के अशी वर्गवारी आहे.
ग्रामीण भागात बदलाचे वारे
गेल्या 24 वर्षांपासून या राज्यावर नवीन पटनायक यांचा एकछत्री अंमल दिसून येतो. यावेळी ग्रामीण भागातील आदिवासी मतदार बदल घडविण्यास अनुकूल असल्याचे चित्र जनमत चाचण्यांतून समोर आले आहे. या राज्यातील अनेक गावे दुर्गम भागात असल्यामुळे उमेदवारांना त्यांच्यापर्यंत पोहोचताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रचारावर सगळ्याच पक्षांंनी अधिकाधिक भर दिला आहे. बिजदने उडिया संस्कृतीचा विषय केंद्रस्थानी आणताना भाजप हा उत्तर भारतीय तोंडावळा असलेला पक्ष आहे, असा प्रचार चालवला आहे.
मिशन शक्ती योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेले सहा लाख महिलांचे स्वयंसेवा गट ही बिजदची जमेची बाजू आहे. यामध्ये सत्तर लाख महिलांचा समावेश आहे. या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. याच्या उलट, आम्ही सत्तेवर आलो, तर केंद्राकडून जास्तीत जास्त निधी आणून ओडिशाचा कायापालट घडवू, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. बिजदकडे मातब्बर उमेदवारांची वानवा असल्याचे दिसून येते. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपला रामराम ठोकलेल्या आठ उमेदवारांना बिजदने तिकीट दिले आहे. भाजपने बिजदमधून फुटून आलेल्या दोन जणांना कमळाच्या चिन्हावर रिंगणात उतरविले आहे. नाही म्हणायला काँग्रेसने आयाराम-गयारामांना जवळ केलेले नाही. तथापि, त्या पक्षाची स्थिती म्हणावी तशी मजबूत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिजद आणि भाजप यांच्यातच चुरशीचे सामने होत आहेत.