सातारा : मोठमोठ्या होर्डिंगचा कराडला विळखा

कराड ः मुंबईतील घाटकोपर घटनेनंतर चा विषय एैरणीवर आला आहे. कराड शहरालाही मोठमोठ्या होर्डिंगचा विळखा पडल्याचे पहावयास मिळत असून शहरातील जवळपास बहुतांश मुख्य चौक, प्रमुख मार्गालगतच्या मोठमोठ्या इमारतीवर अवाढव्य होर्डिंग मागील काही वर्षापासून पहावयास मिळतात. गतवर्षी वादळी वार्‍याने तहसील कार्यालय परिसरातील होर्डिंगची झालेली अवस्था पाहून अंगावर काटा येत होता. आता घाटकोपर घटनेनंतर तरी गांधारीच्या भूमिकेतील …

सातारा : मोठमोठ्या होर्डिंगचा कराडला विळखा

चंद्रजीत पाटील

कराड ः मुंबईतील घाटकोपर घटनेनंतर चा विषय एैरणीवर आला आहे. कराड शहरालाही मोठमोठ्या होर्डिंगचा विळखा पडल्याचे पहावयास मिळत असून शहरातील जवळपास बहुतांश मुख्य चौक, प्रमुख मार्गालगतच्या मोठमोठ्या इमारतीवर अवाढव्य होर्डिंग मागील काही वर्षापासून पहावयास मिळतात. गतवर्षी वादळी वार्‍याने तहसील कार्यालय परिसरातील होर्डिंगची झालेली अवस्था पाहून अंगावर काटा येत होता. आता घाटकोपर घटनेनंतर तरी गांधारीच्या भूमिकेतील पालिका प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कराड शहरातील शिवतीर्थ (दत्त चौक), कार्वे नाका, कृष्णा नाका, कृष्णा पूल, कॉटेज हॉस्पिटल, विजय दिवस चौक, बसस्थानक परिसर, भेदा चौक, प्रीतिसंगम बाग परिसर, चावडी चौक परिसर, तहसील कार्यालय परिसर, पोपटभाई पेट्रोल पंप परिसर, कोल्हापूर नाका या परिसरात मोठमोठ्ठी होर्डिंग्ज वर्षानुवर्ष पहावयास मिळतात. याशिवाय आर्थिक लाभाच्या मोहापायी मुख्य बाजारपेठेसह शहरातील अनेकांनी आपल्या इमारतींवर होर्डिंग लावण्यास परवानगी दिली आहे. वर्षानुवर्ष हे होर्डिंगचे लोखंडी सांगाडे ऊन, वारा, पाऊस सोसून उभे आहेत. होर्डिगसाठी ज्या लोखंडी अँगलवर फ्लेक्स उभारले जातात, ते अँगल वर्षानुवर्ष रंग न दिलेल्या अवस्थेत असल्याने ते गंज पकडू शकतात. मात्र हे कोण तपासणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
शहरातील विजय दिवस चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप परिसर, भेदा चौक, शाहू चौक, प्रीतिसंगम बाग, तहसील कार्यालय परिसरात नेहमीच वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ पहावयास मिळते. त्यामुळे वादळी वार्‍याचा तडाखा बसून कराड शहरातही होर्डिंग पडून एखादी दुर्घटना घडू शकते आणि असे झाल्यास कोण जबाबदार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात लागणारे फ्लेक्स व होर्डिंग पाहता प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन ते चार सदस्यांची स्वतंत्र नियुक्ती करणे आवश्यक आहे. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज मुजावर यांच्या तक्रारीनंतर एका नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा दाखल झाला होता. शहरातील अनेक फ्लेक्स लावताना साधी परवानगी सुद्धा घेण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच. याशिवाय पालिकेचा महसूल बुडून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील घटनेतून शहाणपण नाहीच…
मुंबईतील घाटकोपरप्रमाणेच काही वर्षापूर्वी पुणे शहरात रस्त्यावर सिग्नलवर उभ्या असणार्‍या वाहनांवर होर्डिंग पडले होते. या घटनेनंतर राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याचे घाटकोपर घटनेवरून समोर आले आहे. त्यामुळेच भविष्यात असा प्रकार कराड शहरात घडल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशीच सध्यस्थिती आहे.
नगरपालिकेचे ठराव कागदावरच
सुमारे दहा वर्षापूर्वी शहरात लागणार्‍या फ्लेक्समुळे कराड शहरातील प्रीतिसंगम बाग, शिवतीर्थ (दत्त चौक) आणि कोल्हापूर नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसरासह कोल्हापूर नाका परिसरात फ्लेक्स लावण्यास मनाई करणारा ठराव नगरपालिका सभागृृहात करण्यात आला होता. मात्र ठराव करताना जे नगरसेवक सभागृहात होते त्याच नेत्यांकडून अथवा त्यांच्या समर्थकांकडून शिवतीर्थ परिसरात सर्वाधिक फ्लेक्स लावले जातात. सध्यस्थितीत प्रीतिसंगम बाग, शिवतीर्थ आणि कोल्हापूर नाका परिसरातही फ्लेक्स पहावयास मिळतात.