चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार पाटील यांना महाबळेश्वरातून अटक

चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार पाटील यांना महाबळेश्वरातून अटक

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : बिअर शॉपीचा परवाना काढण्यासाठी एक लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी आठवडाभरापासून फरार असलेले चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार पाटील यांना महाबळेश्वरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज मंगळवारी (दि.14) चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.  ह्या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस येथील तक्रारदार यांचे “गोदावरी बार ॲन्ड रेस्टॉरंट” या नावाने बार आहे. त्यांना पुन्हा  नवीन एका बिअर शॉपीचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे अर्ज सादर केला होता. परंतु,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार पाटील आणि चेतन खारोडे यांनी तक्रादार यांना परवाना देण्यास  टाळाटाळ केली व परवाना मंजुर केला नाही. आरोपी चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना बिअर शॉपीचा परवाना मंजुर करण्यासाठी अधीक्षक आणि  स्वतः करीता  एक लाखाची मागणी केली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची चौकशी करून आठवडाभरापूर्वी 7 मे ला सापळा रचून त्याच कार्यालयातील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना एक लाख रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. सदर प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक संजयकुमार पाटील यांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तेव्हापासून अधीक्षक फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. आज महाबळेश्वर पाटील असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागा मिळाली. विशेष मोहिम राबवत महाबळेश्वरातून पाटील यांना अटक केली. आरोपी पाटील यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.