बीड- परळी महामार्गावर कारचा अपघात; चार जण जखमी

बीड- परळी महामार्गावर कारचा अपघात; चार जण जखमी

दिंद्रुड; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड जवळील बीड-परळी महामार्गावरील एक खड्डा चुकवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याचा दरम्यान घडला. या अपघातात कार बाजूला असणाऱ्या पुलाचे कटडे तोडून पुलाखाली जाऊन पडली. या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बीड- परळी हायवेवरील दिंद्रुडजवळ भर रस्त्यात गेल्या दोन वर्षांपासून एक खड्डा ये-जा करणाऱ्यांना गंभीर अपघातांचे कारण बनला आहे. जवळपास १२ अपघात गेल्या दोन महिन्यात या खड्ड्यामुळे झाले आहेत. मंगळवारी परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील कल्याण घाडगे, प्रल्हाद भुमरे, शिवाजी वडमारे व अन्य एक जण धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथे नवस फेडण्यासाठी आले होते. सायंकाळी परत गावी जात असताना खड्डा चुकवण्याच्या नादात कार पुलाला धडकून पुलाखाली जाऊन पडली.
दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार बालाजी सूरेवाड, रेवन दुधाने व वाहन चालक युनूस शेख हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी सतर्कता दाखवत रुग्णवाहिका लवकर येत नसल्याचे पाहून गंभीर जखमींना पोलीस वाहनात पात्रुड येथील शासकीय रुग्णालयात हलवले.
गेल्या दोन वर्षांपासून बीड- परळी महामार्गावरील दिंद्रुड जवळ असलेला खड्डा अनेकांना मृत्यूचे कारण बनत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा याबाबत माहिती देवूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याने संगम येथील माजी उपसरपंच बळीराम डापकर यांनी संताप जनक प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा 

Delhi Lok Sabha: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकसभा निवडणूकीचा मूड बदलला
स्‍वाती मालीवाल यांच्‍याशी गैरवर्तन : ‘आप’ने सोडले मौन, संजय सिंह म्‍हणाले…
Sourav Ganguly : टी-20 वर्ल्डकपसाठी कोहलीला सलामीवीर म्हणून प्राधान्य द्यावे : सौरव गांगुली