मतदानाचा टक्का घसरला; पहा कोणत्या मतदारसंघांत किती झाले मतदान
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर आणि मावळ या तीनही लोकसभा मतदारसंघांत सोमवारी (दि. 13) मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे तिन्ही लढती अटीतटीच्या ठरतील, अशी चिन्हे आहेत. पुणे शहरात 50.50 टक्के मतदान झाले; म्हणजे गेल्या निवडणुकीत झाले त्याच्या आसपासच मतदान झाले. तर, शिरूरमध्ये 47.50 टक्के आणि मावळमध्ये 52.30 टक्के मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांत मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले.
पुणे शहरात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत झाली. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतच लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आव्हान दिले आहे. मावळ मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील आहेत. तेथे शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. पुण्यातील तळजाई भागात काल सायंकाळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घोषणाबाजी देत समोरासमोर आले होते. कसबा पेठ मतदारसंघातही आज सकाळी किरकोळ स्वरूपाचा निषेध झाला.
मात्र, दिवसभर सर्वत्र शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. पुणे शहरात सकाळी मतदानाचा वेग चांगला होता. मात्र, दुपारी 1 नंतर तो मंदावला. सायंकाळच्या सुमारास मतदारांची संख्या मतदान केंद्रांवर वाढू लागली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यातील मतदान 44.9 टक्के झाले होते. पावसाची शक्यता जाणवू लागली होती. काही भागांत मतदान संपण्याच्या सुमाराला पावसाने हजेरी लावली. अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. सहा वाजण्याच्या सुमाराला शहरात सर्वत्र पाऊस कोसळू लागला. पुण्यात सुमारे 50.50 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने रात्री वर्तविला.
कोथरूड मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत 38.73 टक्के मतदान झाले होते; म्हणजे जवळपास दोन लाख मतदान झाले होते. कसबा पेठ मतदानसंघात 51.07 टक्के मतदान झाले असले, तरी हा मतदारसंघ आकाराने लहान असल्याने तेथे एक लाख 41 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवाजीनगर मतदारसंघात सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. तेथे सायंकाळी पाचपर्यंत 38.73 टक्के म्हणजे एक लाख सात हजार मतदारांनी मतदान केले होते. पुण्यातील मतदारसंख्येने सर्वांत मोठ्या असलेल्या वडगाव शेरीमध्ये 40.5 टक्के म्हणजे एक लाख 89 हजार मतदारांनी मतदान केले होते. शेवटच्या तासाभरात या सर्वच मतदारसंघांत मतदानाचा वेग वाढला होता.
कोथरूड, पर्वती या मतदारसंघांत महायुती आघाडीवर राहण्याची शक्यता कार्यकर्त्यांच्या चर्चेत वर्तविली जात आहे; तर कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महाविकास आघाडी मताधिक्य घेण्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीच्या आसपासच मतदान झाले असताना दोन्ही बाजूंनी ही लढत अटीतटीची होत असल्याचे सांगण्यात आले. बोपखेल येथील मुळा नदीपासून ते मुंबईच्या समुद्रापर्यंत असे पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज 52.30 टक्के मतदान झाले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रांवर मतदानप्रक्रिया सुरू होती.
पुढील महिन्यात चार तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मावळसाठी खासदार मिळणार आहे. मावळ लोकसभेत एकूण 25 लाख 85 हजार 18 मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 13 लाख 50 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावली होती. मात्र, फारसा जोर दिसला नाही. उन्हाची तीव्रता कमी होत गेल्याने दुपारी चारनंतर नागरिकांची संख्या पुन्हा वाढली. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. घोळक्याने मतदान केंद्रांबाहेर जमू लागले. त्यामुळे केंद्रांवर लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सहापर्यंत केंद्रांवर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मतदान करू देण्यात आले. त्यामुळे अनेक केंद्रांवर रात्री आठपर्यंत मतदान सुरू होते.
शिरूर मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 43.89 टक्के मतदान झाले होते. मतदार संख्येच्या दृष्टिकोनातून हडपसर आणि भोसरी हे मतदारसंघ मोठे आहेत. हडपसरमध्ये 5.81 लाख मतदार असून, त्यांच्यापैकी 38 टक्के मतदान म्हणजे दोन लाख 21 हजार मतदारांनी पाच वाजेपर्यंत मतदान केले होते. भोसरीमध्ये 5.51 लाख मतदार असून, त्यांच्यापैकी 42.24 टक्के मतदान म्हणजे दोन लाख 32 हजार मतदारांनी पाच वाजेपर्यंत मतदान केले होते. शिरूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे 41 टक्के मतदान, तर आंबेगावमध्ये सर्वांधिक म्हणजे 53 टक्के मतदानाची नोंद झाली होती. खेड- आळंदीत 48, तर जुन्नरमध्ये 47 टक्के मतदानाची नोंद सायंकाळी पाचपर्यंत झाली होती.
मतदान टक्केवारी
मतदारसंघ 2019 – 2024
पुणे शहर 49.87 – 50.50
शिरूर 59.44 – 47.50
मावळ 59.57 – 52.30
हेही वाचा
राज्यात चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान
लंडनच्या तरूणाने पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयात लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात