राज्यात चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान

राज्यात चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील चौथ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघांत सोमवारी रात्री 11 पर्यंतच्या केेंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 59.33 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये या 11 लोकसभा मतदारसंघांत 57.09 टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळेस या सरासरीत 2 टक्क्यांची वाढ दिसते.
राज्यातील गेल्या तीन टप्प्यांतील मतदानापेक्षाही कमी मतटक्का चौथ्या टप्प्यात दिसत असून मतदानाची अंतिम आकडेवारी पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अधिक असणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
देशातील महाराष्ट्रासह 10 राज्यातील 96 मतदारसंघात 64.37 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
राज्यात सर्वात कमी मतदान 51.25 टक्के पुणे लोकसभा मतदारसंघात झाले असून, सर्वाधिक 68.30 टक्के मतदान मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना मतदारसंघात झाले आहे. याखालोखाल 67.14 टक्के मतदान बीड तर आदिवासी बहूल नंदूरबारमध्ये 67.12 टक्के मतदान झाले आहे.
या मतदानासह भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिवसेना (उबाठा) गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप खासदार रक्षा खडसे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे डॉ. अमोल कोल्हे, डॉ. हीना गावित यांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे.
सर्वच मतदारसंघांत अटातटीचा सामना रंगला असून, मतदारांनी कुणाला आपला आशीर्वाद दिला, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
तीन मतदारसंघांत वाढला मतटक्का
2019 च्या मतदान टक्केवारीशी तुलना केल्यास जालना, बीड आणि पुणे मतदारसंघांत मतटक्का वाढला आहे. जालना मतदारसंघात गेल्यावेळेच्या तुलनेत 3.8 टक्क्यांनी, तर बीड मतदारसंघात 1.08 टक्क्यांनी अधिक मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहता येथे झालेले अधिक मतदान हे परिवर्तनासाठी तर झालेले नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पुण्यात गेल्यावेळेस 50 टक्केही मतदान झाले नव्हते. यावेळेस येथील मतदान 51.25 टक्के झाले.
शिरूरमध्ये मतटक्क्यांमध्ये सर्वाधिक घसरण
तीन मतदारसंघांचा अपवाद वगळता उर्वरित 8 मतादरसंघात 2019 च्या तुलनेत मतटक्क्यात घसरण पाहायला मिळाली. मतदारांमधील निरूत्साह, मतदार यादीतून अनेकांची नावे गहाळ होणे, कडक ऊन, काही मतदारसंघांत वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी या कारणांमुळे मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला. शिरूरमध्ये मतटक्क्यांमधील सर्वाधिक 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत आहे. सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्यातील लढत रंगलेल्या अहमदनगर मतदारसंघात गेल्यावेळच्या तुलनेत 5 टक्क्यांनी, मावळमध्ये 6.59 टक्के तर बहुरंगी लढतीच्या संभाजीनगरात 7.57 टक्क्यांनी कमी मतदान झाले.