आमच्या मागण्याही लोकसभेत मांडा..! चिमुकल्यांनी पाठविला बालहक्काचा जाहीरनामा
संगमनेर शहर : Bharat Live News Media वृतसेवा : देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. निवडणुकांमध्ये नेहमी मोठ्याचे प्रश्न आणि त्यांच्याच मागण्या मांडल्या जातात; परंतु लहान मुलांचे प्रश्न नेहमी दुर्लक्षित राहतात. त्यामुळे बालकांचे प्रश्न लोकसभेत मांडले जावेत यासाठी संगमनेर येथील चिमुकल्यांनी चक्क उमेदवारांनाच बालहक्कांचा जाहीरनामा पाठवला आहे. ‘अच्छी आदत’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या शिरीषकुमार संविधान गट वेल्हाळे, साऊ-ज्योती संविधान गट भांड मळा, अण्णा भाऊ साठे गट, गांधीनगर व बालस्नेही गाव पोखरी हवेली या गटातील बालकांनी त्यांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार केला आहे.
या जाहीरनाम्यात बालकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी काय वाटते हे त्यात मांडले. मोठ्यांनी बालकांसाठी काय करायला हवे, हेदेखील बालकांनी त्यात मांडले आहे. हा जाहीरनामा लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठवला आहे. मागणीचा जाहीरनामा देऊन त्यावर चर्चा केली. उमेदवारांनी मनमोकळ्या गप्पा करत या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निवडणूक झाल्यानंतर ही गटातील सर्व बालके या जाहीरनाम्याचा पाठपुरावा करतील, असे सर्वानुमते ठरले. या वेळी गटातील बालके धनश्री पवार, माधुरी पवार, दीक्षा साबळे, श्रावणी दिवे, आराध्या खाडे, अभिमन्यू खाडे, ओम खरात, आदित्य मिसाळ, कार्तिकी परिश्रामी, जय खाडे, अविनाश समशेर, पालक प्रतिनिधी सचिन खाडे व स्वप्निल मानव उपस्थित होते. ल
काय आहेत बालकांच्या मागण्या..
शाळेत 24 तास पिण्यासाठी पाणी मिळावे
24 तास मोफत दवाखाना, रुग्णवाहिका मिळावी
रस्त्यावर मृत प्राण्यांची तत्परतेने विल्हेवाट लागावी
मुलांसाठी योगशाळा, व्यायामशाळा, नाट्यगृहे उभारावीत
प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशन केंद्र निर्मिती करावी
शाळेमध्ये चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा
प्रत्येक गावात ई लर्निंगची सुविधा करण्यात यावी
शाळेसाठी सायकल किंवा वाहतूक व्यवस्था करावी
शाळा भरताना व सुटताना ट्रॅफीक कंट्रोल टीम असावी
शाळेत प्रशस्त क्रीडांगण, तसेच प्रशिक्षकहीे असावेत
मुलींसाठी शाळेत स्वच्छ व स्वतंत्र स्वच्छतागृह असावे
संगणक, कार्यानुभव, प्रयोगशाळांची व्यवस्था असावी
बालसुरक्षा जनजागृती करताना हेल्पलाईन असावी
वस्तीमधील दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत
हेही वाचा
गोंदिया जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे संकट; ३ दिवस येलो अलर्ट
‘सोयाबीनचे घरचे बियाणे वापरा’ मोहीम; विभागीय कृषी सहसंचालकांची माहिती
नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू