जिल्हाधिकार्यांची मतदान केंद्रांना भेट; पावसामुळे घेतला जिल्ह्यातील केंद्रांचा आढावा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरिता सोमवारी (दि.13) मतदान होत आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे शहरातील विविध मतदारसंघातील साहित्य वितरण केंद्र आणि मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान डॉ. दिवसे यांनी संबंधित मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून साहित्य वितरण करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच, मतदान केंद्रावरील व्यवस्थेचाही आढावा घेतला. साहित्य वितरण प्रक्रिया वेळेत आणि शांततेत पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. पावसाची शक्यता लक्षात घेता ईव्हीएम यंत्राच्या सुरक्षेबाबतही त्यांनी या वेळी सूचना दिल्या. डॉ. दिवसे यांनी भेटीदरम्यान पाऊस आल्यास घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना केल्या. त्यांनी पोलिस अधिकार्यांशीदेखील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. शहराच्या मध्यवर्ती भागात मतदान केंद्र परिसरातील वाहनतळ व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली.
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान आज सोमवारी (दि.13) पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.13 मे) मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात दोन हजार 18 मतदान केंद्रे आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही भागाचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात होतो.
पुणे पोलिसांकडून पुणे लोकसभा, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांच्या परिसरात शंभर मीटर परिसरात मोबाइल संचाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्वलनशील वस्तू, शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरातील प्रतिबंधात्मक आदेश उमेदवारांसह, त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा
सांगली : चिंतामणीनगर पूल यंदा तरी होणार का?
हातकणंगले : डंपरची दुचाकीला धडक : महिला ठार
कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस ‘यलो अलर्ट’