शेतीच्या वाटणीवरून वाद, भावावर तलवारीने वार
जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथे शेताच्या वाटणीच्या हिस्याच्या वादावरून एकाला भाऊ व पुतण्यांकडून धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ९ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १० मे रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांतीलाल तुळशीराम राठोड वय-४८ रा. वलठाण ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून कांतीलाल तुळशीराम राठोड व त्यांचा भाऊ चांगदेव तुळशीराम राठोड यांच्या शेतीच्या वाटणीवरून वाद आहे. गुरूवार ९ मे रोजी सकाळी ६ वाजता कांतीलाल राठोड हे त्यांच्या घरी असतांना त्यांचा भाऊ चांगदेव राठोड, पुतण्या ज्ञानेश्वर चांगदेव राठोड आणि संदीप उर्फ सोपान चांगदेव राठोड यांनी वाटणीवरून धारदार तलवार आणि कोयत्याने कांतीलाल राठोड यांच्यावर वार करून जखमी केले. यात ते गंभीररित्या जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या कांतीलाल राठोड यांना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कांतीलाल राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून १० मे रोजी चांगदेव तुळशीराम राठोड, पुतण्या ज्ञानेश्वर चांगदेव राठोड आणि संदीप उर्फ सोपान चांगदेव राठोड तिघे रा. वलठाण ता.चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे हे करीत आहे.
हेही वाचा –
मुंबई : मानखुर्दचे नाव हटवून छत्रपती शिवाजी नगर करणार; पंतप्रधानांच्या रोड शो पूर्वी नव्या वादाला सुरुवात
सोलापूरसाठी उजनीतून सोडले पाणी; धरणकाठावरील शेतकरी चिंतेत