बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तानच्या प्रतिनिधींना भारतीय लोकशाही अन्‌ निवडणूक प्रक्रियेची भूरळ

बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तानच्या प्रतिनिधींना भारतीय लोकशाही अन्‌ निवडणूक प्रक्रियेची भूरळ

जयंत धुळप

 रायगड : भारतातील लोकशाही व्यवस्था पद्धती जगभरातील विविध देशात नावाजलेली आहे. सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया याचा अभ्यास करण्याकरीता बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तान या चार देशाच्या निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी सध्या भारतात आले आहेत. त्यांच्या या अभ्यासाकरीता रायगड लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. गेले चार दिवस हे वरिष्ठ अधिकारी रायगड लोकसभा मतदार संघात फिरुन या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करीत आहेत. आज मतदानाच्या दिवशी रायगडमधील विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांचा मतदानाचा उत्साह पाहून हे सर्व परदेशी प्रतिनिधी हरखूनच गेल्याचे पाहायला मिळाले.
परदेशी अधिकारी रायगडमध्ये का आले आहेत? 

भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी
रायगड मतदार संघ क्षेत्रात दौरा करून अधिकाऱ्यांनी निवडणुकीची घेतली माहिती
उच्चपदस्थ अधिकारी असूनही विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जाऊन केला अभ्यास
भारताच्या निवडणुकीची या परदेशी अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचीही पूर्ण प्रक्रिया
संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली

कोणत्या देशातील अधिकारी रायगडमध्ये आले आहेत?
परदेशातून आलेल्या या प्रतिनिधींमध्ये बांग्लादेश निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी महंमद मोनिरुझ्झमन टी आणि जी एम शाहताब उद्दीन, झाकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन, श्रीलंका देशाच्या निवडणूक आयोगाच्या संचालक सिलया हिलक्का पासिलीना, झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि झिम्बाबे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सिम्बराशे तोंगाई यांचा समावेश आहे. हे सर्व प्रतिनिधी आपापल्या देशातील उच्च पदस्थ अधिकारी असतानाही भारतात लोकशाही व्यवस्थेचा अगदी विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन अभ्यास करताना पाहून भारतीय अधिकारी देखील अचंबित झालेले पहायला मिळाले.
झिम्बाब्वेच्या प्रतिनिधींनी रायगडमधील एका मतदान केंद्राला भेट दिली
बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तान च्या या प्रतिनिधींच्या रायगड जिल्ह्यातील आगमनाच्या दिवशी त्यांचे अलिबाग येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि रायगडचे जिल्हाधिकारी या भूमिकेतून किशन जावळे यांनी परदेशी प्रतिनिधींच्या मंडळाला मतदानाच्या प्रक्रियेबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
स्थानिकांशी कसा संवाद साधला?
कायदा सुव्यवस्थेच्या बाबतची संपूर्ण माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीवकुमार झा, केंद्रीय खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी देखील त्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची परिपूर्ण माहिती या प्रतिनिधी मंडळाला करुन दिली. मंगळवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी भेटी देऊन भाषादुभाषकांच्या मदतीने त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. भारतातील जनसामान्यांच्या लोकशाही व्यवस्थेबाबतच्या भावना जाणून घेतल्या.
हेही वाचा –

Lok Sabha Election 2024: दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.७१ टक्के मतदान, महाराष्ट्रात सर्वात कमी ४२.६३ टक्के मतदानाची नोंद
Loksabha election | मतदान केंद्र थेट पोहोचले ज्येष्ठांच्या घरी; ‘या’ वयोगटातील मतदारांसाठी खास सुविधा
Google Doodle Today : लोकसभा निवडणूक २०२४ : गुगलने बनवले खास डूडल