चंदगड मतदार संघात दुपारपर्यंत गतीने मतदान; एक वाजेपर्यंत ३७.१५ टक्के मतदान
गडहिंग्लज : Bharat Live News Media वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी चंदगड विधानसभा मतदार संघात (२७१) विशेष उत्साह दिसून येत आहे. दुपारी एकपर्यंत येथील मतदानाने ३७.१५ इतकी टक्केवारी गाठली होती.
चंदगड मतदार संघात एकूण ३ लाख १७ हजार ९२२ इतके मतदार असून, यामध्ये १ लाख ५९ हजार ७७२ पुरुष तर १ लाख ५८ हजार १४२ स्त्री मतदार आहेत. गडहिंग्लज तालुक्यात १३८, चंदगडला २०० तर आजरा तालुक्यात ४२ अशा एकूण ३८१ केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानाचा प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रातील उन्हाचा कडाका लक्षात घेता अनेक गावांतील मतदारांनी सकाळच्या टप्प्यातच मतदानासाठी जाणे पसंत केले.
नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक कुटुंबीयांचा एकत्रित मतदान करण्याकडे कल दिसून आला. राजकीय पक्षांकडून मतदारांना आणण्यासाठी चढाओढ दिसत होती. दुपारपर्यंत ६१ हजार ७८ पुरुष, ५७ हजार २८ स्त्री अशा १ लाख १८ हजार १०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यांची दुर्गम मतदारसंघ अशी ओळख आहे. त्यामुळे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये चंदगड मतदार संघाकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. गेले महिनाभर महायुती तसेच महाविकास आघाडीकडून या तिन्ही तालुक्यांवर विशेष लक्ष देण्यात आले. दोन्हीकडून जोरदार प्रचार, मेळावे, सभा पार पडल्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार याचे संकेत दिसत होते. लोकसभेसाठी चंदगड मतदार संघात गतवेळी ६७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी प्रशासनानेही विविध उपक्रम राबविले होते. या सर्वाचा परिणाम मतदानावर दिसून आला. चंदगड मतदार संघात दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील ७०० मतदार असून, यापैकी ६६३ व्यक्तींचे गृह मतदान झाले आहे.
हेही वाचा :
Loksabha election | मतदान केंद्र थेट पोहोचले ज्येष्ठांच्या घरी; ‘या’ वयोगटातील मतदारांसाठी खास सुविधा
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी केले मतदान
ब्रेकिंग : केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ