चुरशीने आज मतदान; कोल्हापूर, हातकणंगलेचा टक्का वाढणार?

चुरशीने आज मतदान; कोल्हापूर, हातकणंगलेचा टक्का वाढणार?

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या, त्यातून टोकाला गेलेल्या ईर्ष्येने, प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 7) चुरशीने मतदान होणार आहे. उमेदवारांतील कमालीची चुरस, शेवटच्या क्षणापर्यंत तापलेला प्रचार, ईर्ष्या आणि मतदारांतील उत्साह लक्षात घेता मताचा टक्का यावेळी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या (2019) निवडणुकीत कोल्हापूर 70.89, तर हातकणंगलेत 70.28 टक्के मतदान झाले होते.
सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत या दोन्ही मतदारसंघांतील 3 हजार 986 मतदान केंद्रांवर एकूण 37 लाख 50 हजार 680 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे शाहू महाराज, महायुतीचे खा. संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर, महायुतीचे खा. धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार, विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यात थेट दुहेरी लढत होत आहे. हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानी पक्षाचे, माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी. सी.पाटील अशी चौरंगी लढत होत आहे.
कोल्हापुरातून शाहू महाराज यांना निवडणूक रिंगणात उतरवत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण करीत प्रचारात आघाडी घेतली. स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांनी वातावरण ढवळून काढले.
उमेदवारी निश्चित करण्यासाठी झालेला विलंब आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापूरवर केंद्रित केलेले लक्ष, केंद्र सरकारने राबवलेल्या जनहिताच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न आणि थेट राजघराण्यावरील आरोपाने महायुतीने प्रचारात रंग भरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेली जाहीर सभा, मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या 22 दिवसांतील सहा दिवस कोल्हापुरात मांडलेले ठाण आणि केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी पिंजून काढलेला मतदारसंघ, यातून कोल्हापुरातील ही लढत महायुतीने प्रतिष्ठेची केल्याने ती राज्यात लक्षवेधी ठरली आहे.
हातकणंगलेत आजी-माजी खासदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महाविकास आघाडीने हातकणंगले मतदारसंघातील निवडणूकही प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतल्या. यासह राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनीही प्रचाराचे रण उठवले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली. स्थानिक आणि राज्यपातळीवरील नेत्यांनीही सभांचा धडाका लावला. दोनवेळा खासदार राहिलेल्या, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या राजू शेट्टी यांनीही आपल्या शिलेदारांच्या साथीने एकहाती किल्ला लढवत मतदारसंघात चुरस निर्माण केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांनीही प्रचारात चुरस निर्माण केली आहे.
मंगळवारी सकाळी सहा वाजता उमेदवार अथवा त्यांच्या राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘मॉक पोल’ (मतदान चाचणी) होणार आहे. यानंतर सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील एकूण 3 हजार 986 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याकरिता 7 हजार 972 बॅलेट युनिट (बीयू), 3 हजार 986 कंट्रोल युनिट (सीयू) आणि 3 हजार 986 व्हीव्हीपॅट अशी एकूण 15 हजार 944 ईव्हीएम प्रत्यक्ष वापरली जाणार आहेत. मतदानासाठी 19 हजार 930 मतदान अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. याखेरीज 4 हजारांवर कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
कोल्हापूर मतदारसंघातील 19 लाख 10 हजार 586 मतदार, तर हातकणंगले मतदारसंघातील 18 लाख 39 हजार 909 मतदार असे एकूण 37 लाख 50 हजार 680 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही मतदारसंघांतील चुरस आणि जिल्हा प्रशासनाने राबविलेले विविध उपक्रम, यामुळे यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी कोल्हापूर मतदारसंघात 70.89 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात 70.22 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी मतदान पथकांना ईव्हीएमसह मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर ही सर्व पथके मतदान केंद्रांवर सायंकाळपर्यंत पोहोचली.
कोल्हापुरातून 23, हातकणंगलेतून 27 उमेदवार रिंगणात
कोल्हापूर मतदारसंघातून 23 उमेदवार, तर हातकणंगलेतून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून 14, हातकणंगलेतून 15 असे 29 अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. कोल्हापूरमधून राष्ट्रीय पक्षाचे 2, राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचा एक, तर नोंदणीकृत राज्यस्तरीय पक्षाचे 6 उमेदवार रिंगणात आहेत. हातकणंगलेत राष्ट्रीय पक्षाचा 1, राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे 2, तर राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षाचे 9 उमेदवार रिंगणात.