कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
आशिष ल.पाटील
गुडाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : ऊसाच्या शेतात आलेला गवा मुलीवर हल्ला करायच्या तयारीत असताना मुलीला वाचविण्यासाठी गव्याच्या आडव्या गेलेल्या आईला गव्याने पोटात शिंग खुपसून गंभीर जखमी केले. राधानगरी तालुक्यातील तळगांव येथे आज (दि.६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. निलोफर शमशुद्दीन पन्हाळकर (वय ३८) असे या जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तळगाव येथील शमशुद्दीन पन्हाळकर हे पत्नी निलोफर आणि मुलगी खुशबू यांच्यासह आपल्या शेतात काम करत होते. यावेळी जवळपास असलेल्या जंगलातून कुदळवाडीचा रस्ता ओलांडून तीन गवे पन्हाळकर यांच्या उसात शिरले. एकाच ठिकाणी शेतात आई निलोफर आणि मुलगी खुशबू काम करत असताना खुशबूच्या दिशेने एक गवा आला. मुलीला धडक देण्याच्या तयारीत असताना निलोफर आडव्या आल्याने गव्याने निलोफोर यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गव्याचे शिंग पोटात घुसल्याने निलोफोर गंभीर जखमी झाल्या. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शमशुद्दीन त्या ठिकाणी आले. बाप लेकीने आरडाओरडा केल्याने तिन्ही गवे उसातून तुळशी जलाशयाच्या दिशेने निघून गेले. शमशुद्दीन यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पत्नी निलोफर यांना तातडीने कोल्हापुरातील खाजगी इस्पितळात दाखल केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच छत्रपती मालोजीराजे आणि जि.प.चे माजी सभापती अभिजीत तायशेटे यांनी इस्पितळात भेट देऊन पन्हाळकर कुटुंबियांची विचारपूस केली.
Latest Marathi News कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.