राहुल गांधींनी सत्तेचे स्वप्न पाहू नये; अमित शहांचा टोला

राहुल गांधींनी सत्तेचे स्वप्न पाहू नये; अमित शहांचा टोला

अमरावती; Bharat Live News Media वृत्तसेवा : सध्या काँग्रेसकडून भाजपच्या 400 पारच्या नार्‍याला घेऊन केवळ अफवा पसरवली जात आहे. भाजप 400 पार झाल्यास आरक्षण हटविले जाईल, असे ते म्हणत आहेत. मात्र, तसे काहीच होणार नाही. आरक्षण ही मोदींची गॅरंटी आहे. राहुल गांधी यांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी बुधवारी अमरावतीत केले.
अमरावती लोकसभेच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी बुधवारी सायन्स कोर मैदान येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शहा म्हणाले की, आम्ही बहुमताचा उपयोग कलम 370 हटवण्यासाठी आणि तीन तलाक संपवण्यासाठी केला होता. अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे हत्याकांडावरूनही त्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. राज्यात आता बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. आता उमेश कोल्हे यांच्याप्रमाणे कोणाचीच हत्या होणार नाही, असेही ते म्हणाले. सभेदरम्यानच पाऊस सुरू झाल्याने अमित शहा यांनी भाषण आटोपते घेतले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, रामदास तडस, आमदार प्रवीण पोटे, रवी राणा आदी उपस्थित होते.
कलम 370 ला राहुल गांधींचा विरोध
काँग्रेसवाल्यांनी गेली 70 वर्षे श्रीराम मंदिर लटकवून ठेवले होते. मोदी यांनी पाच वर्षांतच श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनादेखील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, ते आले नाहीत. शरद पवारांची तर प्रकृती खराब होती; मग ते आता प्रचार कसे काय करत आहेत, असा सवालही शहा यांनी उपस्थित केला. काश्मीरमधून कलम 370 हटवत असताना राहुल गांधी यांनी संसदेत विरोध केला होता. मात्र, मोदी यांनी 370 कलम समाप्त करून दहशतवाद नष्ट केला आणि काश्मीरला भारतात समाविष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.
पवारांनी शेतकर्‍यांची माफी मागावी
शरद पवार यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरदेखील शहा यांनी भाष्य केले. शरद पवार कृषिमंत्री असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते. त्यांनी येथील सिंचनासाठी काहीच केले नाही. त्यामुळे शरद पवारांनी नवनीत राणा यांना गेल्या निवडणुकीत समर्थन दिले म्हणून माफी मागितल्यापेक्षा येथील शेतकर्‍यांची माफी मागावी, असे ते म्हणाले.