पहिली-दुसरीच्या पुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष..! पुढे काय?

पहिली-दुसरीच्या पुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष..! पुढे काय?

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. परंतु शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी तसेच प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-2025 (जून 2024) हे पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे इयत्ता पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या.
शैक्षणिक वर्ष 2023-2024 (जून 2023) पासून पथदर्शी स्वरूपात 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण 4 भागात उपलब्ध करून दिली आहेत. या वर्षीसुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-2025 (जून 2024) पासून राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खासगी व विनाअनुदानित शाळांमधील 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.
या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून दिली जातील, असेदेखील कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा

राहुल गांधींनी सत्तेचे स्वप्न पाहू नये; अमित शहांचा टोला
कोल्हापूर : निम्म्या शहरात आजपासून दोन दिवस पाणीबाणी
निवडणुकांवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही : सुप्रीम कोर्ट