वारसा हक्कावरही काँग्रेस कर आकारणार : पंतप्रधान मोदी

रायपूर; वृत्तसंस्था : काँग्रेसच्या पंजाने आधीच जनतेचा प्रचंड पैसा ओरबाडलेला आहे. आता मुलांना आई-वडिलांकडून वारशात मिळणार्‍या संपत्तीवरही कर आकारणीचा कट काँग्रेसने रचलेला आहे. ‘जिंदगी के साथ’ काँग्रेस लोकांना लुटत आलेली आहे, आता संधी मिळाली तर ‘जिंदगी के बाद भी’ लोकांची लूट करण्यात येणार आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला. वारसा हक्कावरही …

वारसा हक्कावरही काँग्रेस कर आकारणार : पंतप्रधान मोदी

रायपूर; वृत्तसंस्था : काँग्रेसच्या पंजाने आधीच जनतेचा प्रचंड पैसा ओरबाडलेला आहे. आता मुलांना आई-वडिलांकडून वारशात मिळणार्‍या संपत्तीवरही कर आकारणीचा कट काँग्रेसने रचलेला आहे. ‘जिंदगी के साथ’ काँग्रेस लोकांना लुटत आलेली आहे, आता संधी मिळाली तर ‘जिंदगी के बाद भी’ लोकांची लूट करण्यात येणार आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.
वारसा हक्कावरही कर आकारणीसंदर्भात काँग्रेसमध्ये गंभीरपणे विचारमंथन सुरू झालेले आहे. तुम्ही कष्टपूर्वक जमवलेली संपत्ती आता तुमच्या मुलांपर्यंत जाणार नाही. या संपत्तीवरही काँग्रेसचा पंजा आपली पकड बसवणार आहे, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. संपूर्ण काँग्रेस पक्ष जे लोक वारसा हक्काने आपापल्या मुलांना सोपवत आले, त्यांना लोकांनी आपल्या मुलांना वारसा हक्काने संपत्ती सोपवू नये, असे वाटते याहून मोठा दुसरा विनोद नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
मी विकसित भारताची गोष्ट करतो, तेव्हा काँग्रेसचे आणि जगातील काही शक्तींचे डोके ठणकते. भारत बलशाली झाला तर त्यांचा खेळ बिघडणार आहे. भारत स्वावलंबी झाला तर त्यांची दुकानदारी बंद होणार आहे. वाटेल तसा उच्छाद घालता यावा म्हणून भारतविरोधी शक्तींना भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे कमकुवत सरकार हवे आहे. देश उद्ध्वस्त होण्याच्या बदल्यात सत्तेचा हव्यास पूर्ण होत असेल तर काँग्रेसला तेही चालते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.