डिझेल चोरणाऱ्या तिघांना अटक; आळेफाटा पोलिसांची कामगिरी
आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेव : रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांतील डिझेल चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व डिझेल असा १७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली. कुणाल रोहिदास बोंबले, ओमकार काळुराम देवकर, राहुल संजय हिंगे (सर्व रा. राजगुरुनगर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी आळेफाटा परिसरातील भोसले पेट्रोलपंपासमोर असलेल्या ट्रान्सपोर्ट ऑफिससमोर उभ्या असलेल्या हायवामधून ६० लिटर डिझेल चोरीस गेले होते. याप्रकरणी रुपेश ज्ञानेश्वर वाळूंज यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याच रात्री परिसरातील बाह्यवळण पुलाजवळ लावलेल्या योगेश मुरलीधर पाडेकर व सुदर्शन संजय जाधव यांच्या सुद्धा वाहनांमधून डिझेल चोरीस गेले होते.
या गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण करीत असताना खबऱ्यांमार्फत आळेफाटा पोलिसांना राजगुरुनगर येथील तिघे डिझेल चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राजगुरुनगर येथून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आळेफाटासह मंचर, पारगाव कारखाना हद्दीतील वाहनांतून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५७५ लिटर डिझेल व गुन्ह्यात वापरलेल्या कार (एम.एच. ०४ एफ. एफ. ००४१) व कार (एम.एच. ०४ एच.एफ. ३८८८) असा एकूण १७ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, प्रवीण आढारी, नवीन अरगडे यांच्या पथकाने केली.
Latest Marathi News डिझेल चोरणाऱ्या तिघांना अटक; आळेफाटा पोलिसांची कामगिरी Brought to You By : Bharat Live News Media.