उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा

उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा

रास बिहारी

दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. त्यामुळेच केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षासाठी हे राज्य महत्त्वाचे ठरत आले आहे. यावेळी यूपीमध्ये होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील आठ जागांचा विचार केला, तर मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला होण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. ( Lok Sabha Election ) 
उत्तर प्रदेशात येत्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, मुरादाबाद, रामपूर, नगिना, बिजनोर आणि पिलीभीत या मतदार संघांत 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यावेळच्या लढती तिरंगी होणार असून, यातील प्रत्येक मतदार संघात मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक स्वरूपाची ठरणार आहे. 2019 मध्ये झालेल्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने कैराना, मुझफ्फरनगर आणि पिलीभीत या तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने आठपैकी सहारनपूर, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत या चार मतदार संघांत मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरविले आहे.
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने या आठपैकी सहारनपूर हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसला दिला आहे. काँग्रेसनेही तेथून मुस्लिम उमेदवारालाच तिकीट देण्याचे जवळपास पक्के केले आहे. समाजवादी पक्षाने रामपूर आणि कैरानाहून मुस्लिम उमेदवारांनाच उतरविले आहे. मुरादाबादहून मात्र या पक्षाने ऐनवेळी रुची वीरा यांना तिकीट दिले. सहारनपूर आणि रामपूर येथे सप-काँग्रेसची युती आणि बसप यांनी मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. भाजपने राष्ट्रीय लोक दलाला बिजनोर लोकसभा मतदारसंघ दिला आहे. तेथे रालोदने आमदार चंदन चौहान यांना मैदानात उतरविले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे भाजप-रालोदला मोठा फायदा मिळण्याचे संकेत आहेत.
2019 मध्येसप-बसप आणि रालोद यांची युती होती. काँग्रेसने तेव्हा स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. दलित, मुस्लिम आणि यादव समाजाच्या मतांच्या जोरावर तेव्हा विरोधकांनी सहारनपूर, मुरादाबाद, रामपबर, नगिना आणि बिजनोरमध्ये विजय मिळवला होता. यातील सहारनपूरमध्ये त्यावेळी बसपने बाजी मारली होती. यावेळी भाजपने 2014 मध्ये विजय संपादन केलेल्या राघव शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. युतीनुसार मिळालेल्या जागेवर काँग्रेसने इम्रान मसूद यांना मैदानात उतरविले आहे. बसपने माजिद अली यांना उमेदवारी देऊन मुस्लिम कार्ड खेळले आहे. यामुळे मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट होऊन त्याचा लाभ भाजपला मिळेल, यात संदेह नाही. यावेळच्या निवडणुकांतून हेही स्पष्ट होणार आहे की, मागासवर्गीय मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब करणार की, विरोधी आघाडीच्या जातीपातीच्या राजकारणाला प्राधान्य देणार
कैराना ः यावेळी भाजपने कैरानातून 2019 मध्ये विजय मिळवलेले विद्यमान खासदार प्रदीप कुमार यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध समाजवादी पक्षाने इकरा हसन यांना, तर बसपने श्रीपाल सिंह यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी प्रदीप कुमार यांनी सपच्या तबस्सुम हसन यांना धूळ चारली होती.
बिजनोर ः गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपचे मलूक नागर यांनी भाजपचे उमेदवार भारतेंद्र सिंह यांना पराभूत केले होते. यावेळी ही जागा भाजपने युतीच्या नियमानुसार जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकदलाला दिली आहे. रालोदच्या चंदन चौहान यांचा मुकाबला सपचे दीपक सैना आणि बसपेच विजेंद्र सिंह यांच्याशी आहे.
मुझफ्फरनगर ः ही जागा भाजपने लागोपाठ दोनदा जिंकली आहे. यावेळी पुन्हा एकदा संजीव कुमार बालियान यांना भाजपने तिकीट दिले आहे. यावेळी ते विजयाची हॅट्ट्रिक करू शकतात. गेल्या वेळी त्यांना रालोदचे प्रमुख अजित सिंह यांना धूळ चारली होती. विशेष म्हणजे तेव्हा अजित सिंह यांना सप आणि बसप या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला होता. यावेळी सपने हरेंद्र मलिक यांना, तर बसपने दारा सिंह प्रजापती यांना तिकीट दिले आहे.
नगिना ः गेल्या लोकसभा निवडणुकीत येथे बसपच्या गिरीश चंद्र यांनी भाजपचे उमेदवार डॉ. यशवंत सिंह यांना पराभूत केले होते. यावेळी भाजपने ओम कुमार यांना मैदानात उतरविले आहे. त्यांचा मुकाबला सपचे मनोज कुमार आणि बसपचेसुरेंद्र पाल सिंह यांच्याशी आहे. आझाद पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर हेही यावेळी नगिनामधून निवडणूक लढवत आहेत.
मुरादाबाद ः भाजपने यावेळी मुरादाबादमधून सर्वेश कुमार सिंह यांना तिकीट दिले आहे. समाजवादी पक्षाने येथे सुरुवातीला एस. टी. हसन यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून रूची वीरा यांना उमेदवारी बहाल केली आहे. एस. टी. हसन यांनी गेल्या वेळी येथून विजय मिळवला होता. बसपने इरफान सैफी यांना संधी दिली आहे. गेल्या वेळी काँग्रेसने येथून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली होती.
रामपूर ः या मतदार संघावर आझम खान यांचे कधी काळी वर्चस्व होते. आता त्यांचा प्रभाव घटला आहे. गेल्या वेळी आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या घनःश्याम लोधी यांनी विजय मिळवला होता. यावेळी भाजपने पुन्हा एकदा लोधी यांना संधी दिली आहे. समाजवादी पक्षाने महीबुल्लाह नदवी यांना, तर बसपने झिशान खान यांना तिकीट दिले आहे. ( Lok Sabha Election )
Latest Marathi News उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा Brought to You By : Bharat Live News Media.