रिअल विकास करणारा खासदार दिल्लीत पाठवायचा : आ. संग्राम जगताप
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : काही लोक ‘रील’मध्ये विकासाचा दावा करताना दिसतात. मात्र रिलपेक्षा रियलमध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे, त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाला कामाला लागावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. नगर विकासाच्या भवितव्याची ही निवडणूक असून महायुती,मित्रपक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात आ. जगताप बोलत होते. माजी आ. अरुणकाका जगताप, शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष श्रणिक संघवी, राजेश बोथरा, संजय चोपडा यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार विखे पाटील यांनी संसदेत विकासाचे मुद्दे मांडताना केलेल्या भाषणाचा व्हिडीओ आमदार संग्राम जगताप यांनी मेळाव्यात दाखविला. विकासाचे व्हिजन असणारा खासदार दिल्लीत हवा असून विकासासाठी विखे यांना मत देण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले. खा. विखेंना नगर शहरातून मोठे मताधिक्य देण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. सुजय विखे व मी जिल्हा विकासाचा रोड मॅप तयार केला असून तो लवकरच जनतेसमोर आणू. देशात विक्रमी मतांनी विजयी होण्याचा विक्रम नगरमधून खा. डॉ. सुजय विखेंचा असेल असे आ. जगताप म्हणाले.
खा. विखे पाटील यांनी आगामी काळात विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट आ. संग्राम जगताप यांना सोबत घेत करणार असल्याचे आश्वासन दिले. गतवेळी विरोधात लढलो पण आज महायुतीच्या माध्यमातून आ. जगताप यांनी दाखविलेल्या सहकार्याचे खा. विखेंनी कौतूक केले. महिलांची सुरक्षा, तरुणांच्या हाताला काम, गरिबांना स्वस्त दरात घरे, वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून आदर्श जिल्हा नावारुपाला आणू. जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असे सांगतानाच मी केलेली विकास कामे पाहून मला मतदान करा असे आवाहन खा. विखे पाटील यांनी केले.
विखेंकडून लंकेंचा पंचनामा
मेळाव्यात विखेंनी संसदेत केलेल्या इंग्रजी, हिंदी भाषणाचा व्हिडीओ दाखविल्यानंतर त्याचा संदर्भ घेत खा. विखे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार लंके यांच्या कार्यकर्तृत्वाचा पंचनामा केला. ‘मी संसदेत केलेले भाषण लंके यांनी बोलून दाखविले तर उमेदवारी अर्जही भरायला जाणार नाही. अजून महिनाभर बाकी आहे. रात्रंदिवस माझी भाषणे तोंडपाठ करा अन् जसेच्या तसे बोलून दाखवा, असे आवाहन खा. विखेंनी दिले.
हेही वाचा
अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला फटका! कैर्यांच्या प्रमाणात घट
मोबाईल फोडला म्हणून त्याने मित्रालाच संपवल; आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक
मुंबई : रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे पडणार महागात!
Latest Marathi News रिअल विकास करणारा खासदार दिल्लीत पाठवायचा : आ. संग्राम जगताप Brought to You By : Bharat Live News Media.