रेल्वे स्थानकातील दुकानात भरदिवसा मद्यपान; आरपीएफकडून कारवाई

रेल्वे स्थानकातील दुकानात भरदिवसा मद्यपान; आरपीएफकडून कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रेल्वेमध्ये आणि रेल्वे स्थानक परिसरात मद्यपान करणे प्रतिबंधित असतानाही स्थानकावर भाड्याने घेतलेल्या दुकानदाराकडून याचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर असलेल्या अंब्रेला छत्री गेटलगत एका दुकानदाराला रेल्वे प्रशासनाने जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र, या दुकानदाराने प्रवाशांच्या येण्या-जाण्याची तमा न बाळगता, दुकानात बसूनच मद्यपान करायला सुरुवात केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल झाले. अशा प्रकारची घटना स्थानकावर घडल्याने प्रवासी संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे.
आरपीएफची कारवाई
आरपीएफ अधिकारी म्हणाले, संबंधित दुकानदाराबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही त्याला याबाबत विचारणा केली असता, त्याने असा प्रकार केल्याचे मान्य केले. त्यामुळे आम्ही त्यावर रेल्वे सुरक्षा कायदा कलम 145 नुसार कारवाई केली आहे.
रेल्वे स्थानकावरील दुकानदार हे सगळे रेल्वेचे जावई आहेत. जनाची नव्हे, तर मनाची लाज ठेवावी. प्रवाशांना स्थानकावर बसायला जागा नसतानाही यांना दुकाने लावायला जागा दिली जाते. याचे भान न ठेवता या दुकानांमध्ये दारू घेतली जाते. हे चुकीचे आहे. एकीकडे रेल्वे स्थानक दारुड्यांचे अड्डे बनत असताना, दुसरीकडे आरपीएफ, जीआरपी झोपा काढतात का? संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे मद्यपान करणे चुकीचे आहे. याची रेल्वे सुरक्षाबलाकडून माहिती घेण्यात येईल. तसेच, संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई केली जाईल.
रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग.

हेही वाचा

काळजी घ्या ! पुण्याचा पारा वाढताच; कोरेगाव पार्कचे तापमान 42 अंशांवर
जे. एम. रोडला पादचारी पुलांचा साज; पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे सोपे
Lok Sabha elections 2024 : सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही : उद्धव ठाकरे

Latest Marathi News रेल्वे स्थानकातील दुकानात भरदिवसा मद्यपान; आरपीएफकडून कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.