हुकूमशाही घालवा, लोकशाही आणा : शाहू महाराज

हुकूमशाही घालवा, लोकशाही आणा : शाहू महाराज

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : जगातील ज्या ज्या देशात हुकूमशाही आली, ते देश संपले आहेत. भारतात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी देशातील हुकूमशाही घालवून पुन्हा एकदा लोकशाही आणण्याची गरज आहे, यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम रहा, असे आवाहन शाहू महाराज यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने आयोजित शिवसेना निष्ठांवत मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते.
शाहू महाराज म्हणाले, 1998 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी मला विचारणा केली होती. पण तेव्हा मनोहर जोशी यांनी विक्रमसिंह घाटगे यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, हे बाळासाहेब ठाकरे यांना माहीत नव्हते. घाटगे यांच्या उमेदवारीला मी पाठिंबा दिला होता. तेव्हा शिवसैनिकांची ताकद मी अनुभवली आहे. यावेळीही शिवसैनिक त्याच ताकदीने उभा आहे.
गेल्या काही वर्षांत देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असे चित्र आहे. तीन वर्षांत महाराष्ट्र अस्थिर बनला आहे. त्यामुळे नव्याने लोकशाही रुजवण्याची गरज असून, सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
अरुण दुधवडकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिक शाहू महाराज यांचा प्रचार करणार नाही, अशा अफवा होत्या. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द प्रत्येक शिवसैनिक पाळणार आहे. हातात मशाल घेऊन तुतारी फुंकत शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करेल. शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या बेंटेक्स उमेदवारांना त्यांची जागा दाखवा. हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी संविधान टिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन केले.
यावेळी संजय घाटगे, माजी आमदार सुरेश साळोखे, सुनील शिंत्रे, शहरप्रमुख रवी इंगवले, शुभांगी पोवार, हर्षल सुर्वे आदींची भाषणे झाली. या मेळाव्याला माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…काँग्रेसने सन्मान द्यावा
शाहू महाराज यांना विजयी करण्यासाठी मतदार संघात बैठका, मेळावे घेतले जातात. याठिकाणी प्रत्येक मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत, त्यांना काँग्रेस पक्षाने सन्मान द्यावा, त्यांना प्रचार प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
Latest Marathi News हुकूमशाही घालवा, लोकशाही आणा : शाहू महाराज Brought to You By : Bharat Live News Media.