गणेश खेडकर
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील छावणी भागातील शेख कुटुंबीय साखरझोपेत होते. ही झोप साऱ्या कुटुंबासाठीच चिरनिद्रा ठरेल, असा विचार या कुटुंबाने कल्पनेतही केला नसेल. ज्या दोघांना जाग आली ते बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होरपळून तर अन्य पाच जण गुदमरून मृत्युमुखी पडले. एखादे कुटुंबच अशा घटनेत मृत्युमुखी पडल्याने शहरात याबद्दल हळहळ व्यक्त होत होती. या घटनेचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
शहरातील छावणी भागात दाणा बाजार येथील जैन मंदिराच्या जवळील किंग्स स्टाइल टेलर या इमारतीला ही आग लागली. पहाटे ३.२० वाजता हा प्रकार घडला.
आगीचे कारण
ई-बाईकच्या बॅटरीचा ओव्हर चार्जिंगमुळे स्फोट होऊन, ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तसा दुजोरा दिला आहे.
पाचजण गुदमरून ठार
हमिदा बेगम अब्दुल अजीज (५५), वसीम शेख अब्दुल आजीज (३५), तन्वीर वसीम शेख (२७) शेख सोहेल अब्दुल अजीज (३२), रेश्मा शेख सोहेल शेख (२२), असीम वसीम शेख (३) आणि महानूर ऊर्फ परी वसीम शेख (२), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून सोहेल आणि त्याची पत्नी रेश्मा हे होरपळून तर उर्वरित पाचजण गुदमरून ठार झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
आग लागलेल्या इमारतीत खाली शेख अस्लम शेख युनूस (५५) यांचे किंग्स स्टाइल टेलर नावाने ३० वर्षे जुने कापड दुकान आहे. पहिल्या मजल्यावर शेख अस्लम यांचे ७ जणांचे कुटूंब राहते. दुसऱ्या मजल्यावर हमिदा बेगम यांचे सात जणांचे आणि तिसऱ्या मजल्यावर एक दाम्पत्य, असे 16 जण राहतात. रमजाननिमित्त शेख अस्लम यांनी कापडांचा मोठा साठा केला होता. शिवाय, ते नवीन ड्रेस शिवून द्यायचे. त्यासाठीही अनेक कापडं त्यांच्याकडे आलेले होते. त्यांचे संपूर्ण दुकान कपड्यांनी भरलेले होते. तीन शिलाई मशिन होते. ३ एप्रिलला पहाटे ३ वाजेपर्यंत त्यांचे दुकानात काम सुरु होते. तीन वाजता दुकान बंद करून ते पहिल्या मजल्यावरील घरात गेले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत दुकानाला आग लागली.
काही क्षणात धुराचे आणि ज्वाळांचे लोट शटरमधून बाहेर आले. यामुळे शेजारच्यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड सुरु केल्यावर अस्लम शेख यांचे अख्खे कुटुंबिय गॅलरीच्या बाजुने सिडीच्या सहायाने खाली उतरले. त्यात त्यांचा जीव वाचला. तिसऱ्या मजल्यावर शेख मलिक (३०) आणि त्यांच्या पत्नीनेही गच्चीवरून शेजारच्या इमारतीवर उतरून जीव वाचविला.
झोपेनेच केला कुटुंबाचा घात
दुसऱ्या मजल्यावरील हमिदा बेगम अब्दुल अजीज यांचे कुटूंब आग लागली तेव्हा गाढ झोपेत होते. कुलर लावून ते झोपलेले होते. आग लागल्यावर सर्वात आधी शेजारचे सचिन दुबे, समोरील गौरव बडजाते यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील अस्लम शेखचे कुटुंबिय जागे झाले. त्यांनी आपआपले जीव वाचविले. तिसऱ्या मजल्यावरील दाम्पत्यदेखील उडी मारून शेजारच्या गच्चीवर गेले. मात्र, हमिदा बेगम यांच्या कुटुंबाला लवकर जाग आली नाही. अस्लम शेख यांनी एकदा वर जाऊन दरवाजा वाजविला, तरीही हमिदा यांचे कुटुंबिय जागे झाले नाही. कदाचित कुलर चालू असल्याने बाहेरचा आवाजच त्यांच्यापर्यंत गेला नसावा. काही वेळाने जाग आल्यावर साेहेल आणि त्याची पत्नी रेश्मा यांनी जीव वाचविण्यासाठी जिन्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आग वरपर्यंत गेली होती. तेथेच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्याचवेळी धुराचे लोट घरात घुसल्याने हमिदा यांच्यासह वसीम, तन्वीर आणि असीम व महानूर ऊर्फ परी हे सर्वजण गुदमरून मृत्यूमुखी पडले.
“फुफू जान का बहोत बुरा हुआ”
शेख यांचे नातेवाईक या घटनेमुळे हेलावून गेले होते. त्यांच्या नातेवाईक मोहसीना शेख फक्त एकच ओळ बोलू शकल्या. “फुफू जान का बहोत बुरा हुआ”
घटनास्थळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेट
घटनास्थळी पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी पाहणी केली.
हेही वाचा
छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरातील दुर्घटनेतील मृत व्यक्तींना राज्यसरकार कडून मदत मिळवून देणार : मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव; कपड्याच्या दुकानाला आग, २ चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगर हादरले! मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याने बापलेकाला जीपखाली चिरडले, एकाचा मृत्यू
Latest Marathi News ‘फुफू जान का बहोत बुरा हुआ’ | छत्रपती संभाजीनगरातील अग्नीतांडवात पहाटच काळ बनली Brought to You By : Bharat Live News Media.