लायगुडे दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट : दोन संस्थांच्या निविदा ठरल्या पात्र

लायगुडे दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट : दोन संस्थांच्या निविदा ठरल्या पात्र

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बोपोडी आणि बावधन येथील रुग्णालयांच्या खासगीकरणाला स्थानिकांनी विरोध केल्यावर आता महापालिकेने धायरीतील कै. मुरलीधर लायगुडे रुग्णालयाकडे मोर्चा  वळवला आहे. हितसंबंध जपण्याचा खटाटोप करून दोन संस्थांच्या निविदा पात्र ठरवण्यात आल्या आहेत. लायगुडे रुग्णालय पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठी 15 सप्टेंबर 2023 रोजी निविदा काढण्यात आली. निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने डिसेंबर महिन्यात फेरनिविदा काढण्यात आली. फेरनिविदेसाठी सातारा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि सिल्व्हर ब्रिच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या दोन निविदा पात्र ठरवण्यात आल्या आहेत. यांपैकी एका संस्थेला काम देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

ज्या खासगी रुग्णालयाला लायगुडे रुग्णालय चालवण्यासाठी देण्याचा खटाटोप केला जात आहे. त्यांचे स्वत:चेच रुग्णालय चालवण्यात अडचणी असून, रुग्णांच्या आणि नातेवाइकांच्या ब-याच तक्रारी आहेत. अशी संस्था महापालिकेचे रुग्णालय कसे चालवणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासन स्वत:ची यंत्रणा वापरून स्वत:चे रुग्णालय चालवू शकत नसल्याने खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

जवळपास 5 लाख लोकसंख्या असलेल्या परिसरात लायगुडे हे महापालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. येथे ओपीडी, लसीकरण, रेबीजवर उपचार यांसह प्रसूतिगृह चालवले जाते. सर्वसामान्यांना परडवणा-या दरात उपचार मिळतात. मात्र, नागरिकांच्या सोयीचा विचार न करता आणि मूलभूत गरजा न पुरवता खासगीकरण करण्यात अधिका-यांना जास्त रस आहे.

– महेश पोकळे, शिवसेना विभागप्रमुख, खडकवासला

लायगुडे रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कोणीही लेखी पत्र दिलेले नाही. मनुष्यबळाचा अभाव, यंत्रणेची कमतरता यांमुळे महापालिकेला येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधणे शक्य नाही. पीपीपी तत्त्वासाठी कोणत्याही संस्थेला झुकते माप दिलेले नाही.

– डॉ. भगवान पवार,  आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

हेही वाचा

रायगड : कोलाड येथे कार-ट्रेलरचा भीषण अपघात, २ जण जागीच ठार, एक गंभीर जखमी
ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट
हिंगोली : कार-दुचाकी अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

Latest Marathi News लायगुडे दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट : दोन संस्थांच्या निविदा ठरल्या पात्र Brought to You By : Bharat Live News Media.