पुणे : बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरल्यास होणार कारवाई

पुणे : बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरल्यास होणार कारवाई

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : उन्हाचा तडाखा वाढल्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांसह मूळ हद्दीतील उपनगरांमध्ये पाणीटंचाई भासू लागली आहे. समाविष्ट गावांतील अनेक गावांमधील नागरिकांना तीन-चार दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या वाढली असून, दिवसाला साडेबाराशे टँकर पुरविले जात आहेत. दरम्यान, गरज असेल तेथे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा कमी आहे. उन्हाळ्याचे दोन महिने अद्याप बाकी आहेत. या कालावधीत पाण्याची मागणी वाढते तसेच बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. त्यातच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केल्या गेलेल्या 34 गावांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. समाविष्ट गावांत काही ठिकाणी चार, तीन, दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे.
यामध्ये सूस, म्हाळुंगे, पिसोळी या गावांना चार दिवसांतून, होळकरवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांना तीन दिवसांतून पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी या गावांत प्रतिदिन 1 हजार 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षी हाच आकडा प्रतिदिन 1 हजार 235 वर पोहचला आहे. समाविष्ट गावांतील पाणी पुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार केला जात असून, तो लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा
वाहने धुणे, गार्डन आदीसाठी पिण्याच्या पाण्याचा उपयोग करू नये
महापालिकेच्या उद्यान विभागालाही एसटीपीमधीलच पाणी वापरण्याचे बंधन
…तर बांधकामे थांबविणार
शहरातील बांधकामांना मैला शुद्धीकरण एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परंतु, बांधकाम व्यावसायिकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. केवळ 80 टँकर प्रक्रिया केलेले पाणी नेले जात आहे. या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी कोणते पाणी वापरले जाते, याची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पिण्याचे पाणी वापरणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर तसेच वॉशिंग सेंटरवर कारवाई केली जाणार आहे, गरज वाटल्यास शहरातील बांधकामे थांबविण्याच्या सूचना केल्या जातील, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा

कोल्हापूर : दक्षिणमध्ये काँग्रेस, भाजपची रंगीत तालीम
राज्यात पुढील काळात 12 समूह विद्यापीठे..
सहकार क्षेत्रावरचा विश्वास पुन्हा वाढतोय!

Latest Marathi News पुणे : बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरल्यास होणार कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.