लखनौची गाडी सुसाट, आरसीबी भुईसपाट; बंगळूर घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी
बंगळूर; वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला आपल्या घरच्या मैदानावर सलग दुसर्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ने आरसीबीचा 28 धावांनी पराभव केला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 181 धावा केल्या आणि नंतर आरसीबीला 153 धावांत रोखले. लखनौचा तीन सामन्यांत हा दुसरा विजय आहे, तर आरसीबीचा चार सामन्यांत तिसरा पराभव ठरला. नवोदित स्पीडस्टार मयंक यादवचा जलवा याही सामन्यात पाहायला मिळाला. त्याने 14 धावांत 3 विकेटस् घेतल्या. (RCB vs LSG)
चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनौच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या आरसीबीला विराट कोहली आणि फाफ ड्यु प्लेसिस यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी 4 षटकांत 40 धावा जोडल्या; पण त्यानंतर मणिरमन सिद्धार्थ या इम्पॅक्ट प्लेअरने विराट कोहलीला बाद करून आरसीबीला पहिला धक्का दिला.
विराट कोहली बाद झाल्यानंतर बंगळूरला आणखी दोन मोठे धक्के बसले. वेगवान गोलंदाज मयंक यादवने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठ षटकांनंतर बंगळूरची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा अशी झाली. मयंक यादवने कॅमेरून ग्रीनला क्लीन बोल्ड केले. मयंकने सलग दुसर्या सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीने कहर केला. (RCB vs LSG)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला 103 धावांवर सहावा धक्का बसला. मयंकने रजत पाटीदारला देवदत्त पडिक्कलकरवी झेलबाद केले. रजतने 29 धावा केल्या. दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर हे दोघे क्रीझवर असेपर्यंत आरसीबीला विजयाची आशा होती; पण कार्तिक नवीन उलहकच्या शॉर्टबॉलवर बाद झाला, तर लोमरोरचा पूरनने उत्कृष्ट झेल घेतला. आरसीबीचा डाव 19.4 षटकांत संपुष्टात आला. मयंकने चार षटकांत 14 धावा देत तीन विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन व लोकेश राहुल यांनी 53 धावांची सलामी दिली. ग्लेन मॅक्सवेलने ही भागीदारी तोडताना लोकेशला 20 धावांवर माघारी पाठवले. क्विंटनने आयपीएलमध्ये 3,000 धावांचा टप्पा ओलांडला आणि ए. बी. डिव्हिलियर्स व फाफ ड्यु प्लेसिस यांच्यानंतर हा टप्पा ओलांडणारा तो तिसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला. क्विंटनला मार्कस स्टॉयनिसची चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी 27 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
मॅक्सवेलने पुन्हा फिरकीवर कमाल करताना स्टॉयनिसला (24) झेलबाद केले. मॅक्सवेलने 4-0-23-2 असा स्पेल टाकला. या विकेटनंतर लखनौच्या धावांचा वेग किंचित मंदावला. 17 व्या षटकात टॉप्लीने आरसीबीला मोठे यश मिळवून दिले. क्विंटन 56 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 81 धावांवर माघारी परतला. यश दयालनेही संथ चेंडू टाकून लखनौच्या फलंदाजांना जखडून ठेवले.
19 व्या षटकात निकोलस पूरनने तीन सलग षटकार खेचून लखनौला पुन्हा ट्रॅकवर आणले. निकोलसने 21 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 40 धावा चोपल्या आणि लखनौला 5 बाद 181 धावांपर्यंत पोहोचवले.
हेही वाचा :
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे फडणवीसांचं षडयंत्र : मनोज जरंगे पाटील
सोलापूर : टेंभुर्णी बस स्थानकावर बहिणीच्या वास्तुशांती कार्यक्रमास आलेल्या पुण्यातील महिलेचे दागिने लंपास
पिंपरी : चिखली येथे तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू
Latest Marathi News लखनौची गाडी सुसाट, आरसीबी भुईसपाट; बंगळूर घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी Brought to You By : Bharat Live News Media.