छगन भुजबळांच्या नावाची लवकरच घोषणा

छगन भुजबळांच्या नावाची लवकरच घोषणा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, नाशिक, धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आली असल्याचे वृत्त आहे. नाशिकमधून छगन भुजबळ, तर धाराशिव मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) असा संघर्ष सुरू आहे. सलग दोनवेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे या मतदारसंघातून हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी शिंदे गटाने नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर महायुतीत तणाव वाढला आहे. गोडसे यांनी तब्बल दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शक्तिप्रदर्शन करत उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. शिंदे गटापाठोपाठ भाजपनेही नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. भाजपला नाशिकची जागा न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दुसरीकडे दिल्लीतून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीच आपली नाशिकमधील उमेदवारी निश्चित केल्याचा दावा करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अशातच नाशिक व धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच मिळणार असल्याची माहिती पुढे आली आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धाराशिवचा उमेदवारही ठरल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून विधान परिषद आमदार विक्रम काळे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून धाराशिव लोकसभेसाठी विक्रम काळे आणि नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोडसे निवडणूक लढविण्यावर ठाम
नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे गेल्यास या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचे काय होणार, हा प्रश्न चर्चिला जात आहे. गोडसे निवडणूक लढविण्यावर ठाम असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा त्यांनी केला आहे.
आ. सरनाईकांचाही दावा
दरम्यान, संजय शिरसाठ यांच्यापाठोपाठ आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील, असा दावा केला आहे. आमच्या निवडून आलेल्या खासदाराची जागा दुसऱ्या पक्षाला देणे हा विनोदच आहे. सर्वेक्षणानुसारच उमेदवार ठरवायचे, तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गरजच काय? असा सवाल करत सर्वेक्षणाचा अहवाल बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. गोडसे नाशिकमधून निवडून येतील, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.
Latest Marathi News छगन भुजबळांच्या नावाची लवकरच घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.