गर्दी नियंत्रणासाठी आरपीएफने लढवली ‘ही’ शक्कल !

गर्दी नियंत्रणासाठी आरपीएफने लढवली ‘ही’ शक्कल !

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : उन्हाळी सुट्या आणि सणासुदीमुळे पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेश, बिहारला जाणार्‍या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. स्थानकावरील गर्दीमध्ये चेंगरा-चेंगरीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी आरपीएफने (रेल्वे सुरक्षा बल) शक्कल लढवत, गर्दी रोखण्याचे आणि दुर्घटना टाळण्याचे नियोजन केले आहे. उन्हाळी सुट्यांमुळे पुण्यातून उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूरसह अन्य भागांत जाणार्‍या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. या भागात जाणार्‍या बहुतांश गाड्या या रात्रीच्या सुमारास पुणे स्थानकावरून सुटतात. त्या वेळी गर्दी रोखणे अशक्य असते. त्यापार्श्वभूमीवर आरपीएफकडून या भागात जाणार्‍या प्रवाशांना एका रांगेत उभे करून गाड्यांमध्ये बसवले जात आहे. त्यामुळे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर आणि गाडीमध्ये चढताना होणार्‍या चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यात आरपीएफला यश येत आहे.
काही महिन्यांपूर्वी झाली होती चेंगराचेंगरी
मागील काही महिन्यांपूर्वी पुणे स्थानकावरून जाणार्‍या याच गाड्यांना अशीच गर्दी झाली. मात्र, त्या वेळी प्रशासनाने या गर्दीकडे सर्रास दुर्लक्ष केले होते. त्या वेळी रात्रीच्या सुमारास दानापूरसाठी जाणारी गाडी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर लागली आणि त्यामध्ये बसण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी उसळली. या गर्दीत अनेकांना श्वास घेता येईनासा झाला. चेंगरा-चेंगरी झाली. त्यामध्ये एक जण सापडल्याची माहिती समोर आली. मात्र, त्या वेळी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी सदरील व्यक्तीला दम्याचा त्रास असल्याचे सांगितले. मात्र, ही घटना चेंगराचेंगरीने घडली की दम्याच्या त्रास होता, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्हच आहे.
आरपीएफ अधिकारी म्हणतात, आम्ही सदैव तत्पर
सुट्या, सणासुदीमुळे उत्तर भारतात जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र, या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आम्ही येथे सदैव तत्पर आहोत.
हेही वाचा

पहिला चमचा तीन हजार वर्षांपूर्वी बनला
पुणे-सातारा महामार्गावर चक्का जाम..
लाचखोरीत महसूल विभागाचा पहिला नंबर; पोलिस विभाग दुसर्‍या क्रमांकावर

Latest Marathi News गर्दी नियंत्रणासाठी आरपीएफने लढवली ‘ही’ शक्कल ! Brought to You By : Bharat Live News Media.