दिल्लीचे मुख्यमंत्री बदलणार? केजरीवालांचे उत्तराधिकारी कोण?
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अटक झाल्यानंतर अनेक घडामोडी होत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना एक संदेश पाठवला जो त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी व्हीडीओद्वारे प्रसारित केला तसेच ‘केजरीवाल यांना आशिर्वाद द्या’ या पक्षाच्या मोहिमेची घोषणाही त्यांनी केली. आणि त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरील चेहरा बदलणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची (आप) दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात सत्ता आहे. दिल्लीत स्वतः केजरीवाल मुख्यमंत्री आहेत. स्वतः मुख्यमंत्रीच कोठडीत असल्याने राजधानी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती येण्यापूर्वी केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर चेहरा देण्याचा विचार केजरीवाल यांना करावा लागणार आहे. केजरीवाल यांच्या ठिकाणी पर्यायी चेहरा कोण असेल यावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. “आमचे नेते केजरीवाल जेलमधून सरकार चालवतील,” अशा प्रकारचे वक्तव्य आपचे नेते आणि मंत्री करत आहेत. मात्र व्यावहारिक दृष्ट्या ते शक्य नाही. विविध बैठका, मंत्र्यांसोबत चर्चा, अधिकाऱ्यांना निर्देश देणेही शक्य नाही. तसेच अटक झाल्यानंतर राजकीय नैतिकता म्हणून मुख्यमंत्रीपदावर राहणे योग्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली होती.
दिल्लीतील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांमध्ये केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचे नाव घेतले जात आहे. त्याला कारण ठरले, “त्यांनी केजरीवाल यांचा वाचून दाखवलेला संदेश आणि त्यापुढे सुरू केलेली आशिर्वाद मोहिम. त्यामुळे राष्ट्रपती राजवट किंवा अन्य संकटांपासून दूर राहण्यासाठी केजरीवाल यांच्या पत्नी मुख्यमंत्री, हा एक प्रयोग आपच्या वतीने केला जाऊ शकतो. आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी, सौरभ भारद्वाज यांच्याही नावाच्या चर्चा राजधानीत होत आहेत. मात्र केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही मंत्र्याकडे किंवा नेत्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे दिल्यास नेत्यांमध्ये अंतर्गत दुफळी माजण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी होणे हे आपसाठी फायदेशीर नाही. याउलट केजरीवालांवर अन्याय झाला, हे सांगत प्रचार करणे आपसह मित्रपक्षांना जास्त फायद्याचे राहणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या ठिकाणी चेहरा शोधायचा झाल्यास त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचे नाव पुढे होऊ शकते.
Latest Marathi News दिल्लीचे मुख्यमंत्री बदलणार? केजरीवालांचे उत्तराधिकारी कोण? Brought to You By : Bharat Live News Media.