सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्हानाला बेड्या
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सेवा विकास बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अर्हाना व अॅड. सागर सूर्यवंशी यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी अटक केली. गैरव्यवहार प्रकरणात दोघांचा सहभाग दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपींना रात्री उशिरा विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास सुनावणी घेऊन दोन्ही आरोपींना 4 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
विनय अर्हाना यास ईडीने 429 कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
याबाबतचा सखोल तपास ईडीकडून करण्यात येत आहे. एका आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सीआयडीकडून करण्यात येत आहे. आरोपी अर्हानाविरोधात वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, याबाबत अर्हानाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने अर्हानाला दिलासा देत एफआयआर रद्द ठरविला. परंतु, याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सुनावणी होऊन सीआयडीला तपास करण्यास संमती दिली. त्यानुसार सीआयडीने याबाबत चौकशी सुरू करून विनय अर्हाना व सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे.
सेवा विकास सहकारी बँकेचे मुख्यालय पिंपरी येथे होते. एकूण 25 शाखांत एक लाख ग्राहक होते. 2019 व 2020 मध्ये बँकेच्या ग्राहकांनी आरबीआयकडे सेवा विकास सहकारी बँकेविरोधात गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या. त्यानुसार जून 2021 मध्ये आरबीआयने याबाबत गंभीर दखल घेतल्यावर सेवा विकास बँकेच्या काही संचालकांना अटक देखील करण्यात आली व बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. लेखापरीक्षकामार्फत याबाबतचा एक अहवाल देखील आरबीआयला सादर करण्यात आला. त्याआधारे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या घोटाळ्यावर आधारित विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) नेमली. त्याच्या चौकशीत एकूण 429 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. ईडीने या प्रकरणात जानेवारी 2023 मध्ये बँकेचे पूर्वीचे अध्यक्ष अमर मूलचंदानी व अन्य आरोपींशी संबंधित चौकशी केली. विनय अर्हाना हा आजारी असल्याने येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल असताना त्याने ड्रगमाफिया ललित पाटील यास पळून जाण्यास देखील मदत केल्याची बाब समोर आली.
रात्री उशिरा विशेष न्यायाधीशांसमोर सुनावणी
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार विनय अर्हाना ‘ईडी’च्या कोठडीत होता. सेवा विकास बँक फसवणूक प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यासाठी सीआयडीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ‘प्रॉडक्शन वॉरंट’ घेतले. त्यानुसार अर्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. परंतु, ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण असल्याने ’एमपीआयडी’ कायद्यानुसार त्यांना विशेष न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले.
त्यामुळे अर्हाना व सूर्यवंशी यांना रात्री साडेबाराच्या सुमारास विशेष न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्यापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इतिहासात रात्री उशिरा सुनावणी घेतल्याच्या घटना दुर्मीळ आहेत.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं
आळे येथे दिसून आली तरसाची दोन पिल्ले..!
गर्भवतींना मार्गदर्शक ’किलकारी’ : नऊ महिन्यांच्या प्रवासात येतील रेकॉर्डेड कॉल
Latest Marathi News सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्हानाला बेड्या Brought to You By : Bharat Live News Media.