दोन दशकात काँग्रेस एक अंकीच!

गेल्या वीस वर्षांत झालेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कर्नाटकात दुहेरी आकडा पार केलेला नाही. यंदा तो पार करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या पाव शतकाचा किंवा दोन दशकांचा विचार केला, तर काँग्रेसची पीछेहाट होत चाललेली दिसते. काँग्रेसने 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसला कधीच 9 पेक्षा अधिक … The post दोन दशकात काँग्रेस एक अंकीच! appeared first on पुढारी.

दोन दशकात काँग्रेस एक अंकीच!

गोपाळ गावडा

गेल्या वीस वर्षांत झालेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कर्नाटकात दुहेरी आकडा पार केलेला नाही. यंदा तो पार करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या पाव शतकाचा किंवा दोन दशकांचा विचार केला, तर काँग्रेसची पीछेहाट होत चाललेली दिसते. काँग्रेसने 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसला कधीच 9 पेक्षा अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत. 2004 मधील निवडणुकीत केंद्रात काँग्रेसला सत्ता मिळाली. पण, कर्नाटकात मात्र केवळ 8 जागा मिळू शकल्या होत्या. त्यानंतर 2009च्या निवडणुकीतही काँग्रेसचीच सत्ता केंद्रात आली, तरी राज्यात मात्र काँग्रेसची पीछेहाट झाली होती. काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्या. 2014 मध्ये या पक्षाला 9 जागा मिळाल्या. म्हणजेच जागा तीनने वाढल्या, मात्र केंद्रामध्ये भाजप सरकार सत्तेवर आले. (Lok Sabha Election 2024)
गेल्या लोकसभा निवडणुकीत (2019) काँग्रेसने देवेगौडांच्या निजदशी युती केली. कारण 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने, सर्वाधिक 80 जागा जिंकलेल्या असतानाही 39 जागा जिंकलेल्या निधर्मी जनता दलाच्या एच. डी. कुमारस्वामींना मुख्यमंत्री पद दिले होते आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कर्नाटकात काँग्रेस-निजद युतीचेच सरकार होते. हीच युती लोकसभेला ठेवण्यात आली. मात्र, त्यामुळे भाजपच्या जागांमध्ये काहीच फरक पडला नाही. काँग्रेस-निजद युतीला पूर्णपणे अपयश आले. काँग्रेसला केवळ एकच जागा मिळू शकली. ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश हे मावळत्या लोकसभेतले काँग्रेसचे कर्नाटकातील एकमेव खासदार. (Lok Sabha Election 2024)
2014 पासून भाजप दिवसेंदिवस बळकट होत चालल्याने काँग्रेसने निजदशी युती करून अधिकाधिक जागा मिळवण्याचा हिशेब घातला होता खरा; पण निजदचा बालेकिल्ला असणार्‍या जुन्या म्हैसूर आणि मंड्या परिसरात निजदलाही साफ अपयश आले. त्यामुळे ही युती औटघटकेची ठरली. पुढे 2019 च्या मध्यावर काँग्रेस-निजदमधून 17 आमदार फुटले आणि काँग्रेस-निजद युती सरकार कोसळले. पुढे येडियुराप्पा, बसवराज बोम्मई हे दोन नेते भाजपकडून मुख्यमंत्री झाले. मात्र, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवता आले नाही. (Lok Sabha Election 2024)
गेल्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पंचहमी योजनांचे आश्वासन दिले होते. त्या जोरावर काँग्रेसला 224 पैकी 135 जागा मिळाल्या. आता त्याच हमी योजनांच्या लोकप्रियतेच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची, ही काँग्रेसची रणनीती आहे. याच योजनांच्या जोरावर काँग्रेसने यंदा 20 जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हमी योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी काँग्रेसने सरकारी निधी खर्च करून समित्यांची स्थापना केली आहे. यामुळे काँग्रेसला अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. केंद्रीय योजनांपेक्षा हमी योजनांची चर्चा अधिक होत आहे. बहुतेक मतदार संघांत सर्वानुमते उमेदवार देण्यात आले आहेत. तरीही काँग्रेसला गेल्या 20 वर्षांचा इतिहास बदलायचा आहे. ते शक्य होईल का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. (Lok Sabha Election 2024)
Latest Marathi News दोन दशकात काँग्रेस एक अंकीच! Brought to You By : Bharat Live News Media.