रोडरोमियोंचा उच्छाद..! पोलिस ठाण्यात तक्रारी नसल्याने पोलिस अनभिज्ञ

रोडरोमियोंचा उच्छाद..! पोलिस ठाण्यात तक्रारी नसल्याने पोलिस अनभिज्ञ

संतोष शिंदे

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहर परिसरात रोडरोमियोंनी उच्छाद मांडल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. रस्त्याने जाणार्‍या मुलींकडे पाहून शिट्ट्या मारणे, हॉर्न वाजवणे यांसारखे प्रकार वाढले आहेत. दुचाकींवर घिरट्या घालणारी टवाळखोर मंडळी शहरातील वातावरण खराब करत आहेत. याप्रकरणी मुली समोर येऊन तक्रार देत नसल्याने या वाढत्या प्रकारांबाबत पोलिसही अनभिज्ञ आहेत.उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणार्‍या महिलांसह शाळकरी मुलींची वर्दळ असते. याचाच फायदा घेत काही टवाळखोर मंडळी दिवसभर रस्त्याने घिरट्या घालत असतात.
एकट्या महिला, मुलींकडे पाहून जोरजोरात हॉर्न वाजवणे, शिट्या मारणे, गाणी म्हणणे, अशी कृत्ये बेधडकपणे केली जातात. मुलीने याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास किंवा रागाने पाहिल्यास रोडरोमियो पळ काढतात. त्यामुळे महिला तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. पोलिस ठाण्यात तक्रारी जात नसल्याने पोलिस शहरातील वाढत्या टवाळखोरीबाबत अनभिज्ञ आहेत.
शाळा, महाविद्यालय परिसरातही टवाळखोरांचा घोळका
शाळा, महाविद्यालय परिसरातील टवाळखोरी मोडून काढण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी एकूण 33 दामिनी पथके शहरात कार्यरत आहेत; मात्र तरी देखील शाळा आणि महाविद्यालय सुटण्याच्या वेळांमध्ये टवाळांची गर्दी असल्याचे सर्रास पहावयास मिळते. या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी ’स्पेशल ड्राइव्ह’ घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी निगडी बस थांब्याजवळून दुचाकीवर जात होते. त्यावेळी समोरून विरुद्ध दिशेने एका दुचाकीवर तिघेजण आले. दुचाकीचा कर्कश हॉर्न वाजवून त्यांनी माझ्याकडे पाहून गाणी म्हणण्यास सुरुवात केली; तसेच माझ्या दुचाकीला कट मारला. मी जोरात ओरडून त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते खिदळत निघून गेले. कामावर पोहोचण्याची घाई असल्याने मी देखील याकडे दुर्लक्ष करीत निघून गेले. अलीकडे पुन्हा असे प्रकार वाढू लागले आहेत.
– पीडित तरुणी, निगडी
शाळा, महाविद्यालय परिसरात दामिनी पथकाची नियमित गस्त सुरु असते. मुलींनी दामिनी पथकाकाकडे तक्रार करावी. याव्यतिरिक्त इतर कोठे टवाळखोर मुले त्रास देत असल्यास महिलांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तसेच, दररोज घोळका करून थांबणार्‍या टवाळखोरांबाबत स्थानिक पोलिसांना गुप्तपणे माहिती द्यावी. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– सतीश माने, सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी- चिंचवड.

पुन्हा फुटू लागला बुलेटचा फटाका
फटाक्यांचा आवाज करणार्‍या बुलेटची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. शाळा, कॉलेज परिसरात धडकी भरवणारा आवाज काढत टवाळखोर बुलेटस्वार फिरताना दिसत आहेत. दरम्यानच्या काळात वाहतूक विभागाने अशा बुलेटस्वारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. त्यावेळी अशा घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले; मात्र आता पुन्हा एकदा फटाक्यांचे आवाज वाढल्याने कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा

शरद पवांराच्या भेटीनंतर नितीन ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट
ब्रेकिंग | के. कविता यांना दिलासा नाहीच, ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी

Latest Marathi News रोडरोमियोंचा उच्छाद..! पोलिस ठाण्यात तक्रारी नसल्याने पोलिस अनभिज्ञ Brought to You By : Bharat Live News Media.