दौंडच्या ग्रामीण भागातील यात्रांची तयारी पूर्ण; बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईचे सावट
खोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील पडवी, देऊळगावगाडा, खोर व भांडगावच्या यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र, यावर्षी गावांच्या यात्रा उत्साहावर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. पिण्याला पाणीदेखील उपलब्ध नसल्याने यावर्षी यात्रा कशाप्रकारे पार पडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाव परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिर परिसरात विद्युतरोषणाई करून गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. पडवी येथे दावलमलिक बाबा यांचा उरूस भरणार आहे. रविवारी (दि. 31) सायंकाळी दावलमलिक बाबा यांचा संदल कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवारी (दि. 2 एप्रिल) सायंकाळी मनोरंजनासाठी कै. साहेबराव नांदवळकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. 3) हजेरीचा कार्यक्रम पार होईल आणि सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.
देऊळगावगाडा येथे हजरत ख्वाजा राजबक्षार पीरसाहेब यांची यात्रा पार पडली जाणार आहे. सोमवारी (दि. 1 एप्रिल) सायंकाळी संदलचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (दि. 2) सायंकाळी छबिना, त्यानंतर मनोरंजनासाठी सुनीताराणी बारामतीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. बुधवारी तमाशा मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर सायंकाळच्या सुमारास कुस्त्यांचा आखाडा पार पडणार आहे. मंगळवारी (दि. 2 एप्रिल) खोर गावच्या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. श्रीकाळभैरवनाथ व तुकाईमाता तसेच हजरत ख्वाजा राजबक्षार पीरसाहेब यांची एकत्रित यात्रा असणार आहे. सकाळी श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये देवाला पोशाख चढवण्यात येणार असून, महाभिषेक होऊन त्यानंतर अष्टमी कार्यक्रम पार पडणार आहे.
सायंकाळी वाजत-गाजत पालखी मिरवणूक व हजरत ख्वाजा पीरसाहेब यांचा संदलचा कार्यक्रम पार पडणार आहे. बुधवारी (दि. 3) सायंकाळी सुनीताराणी बारामतीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे, तर पिंपळाची वाडी येथे चंद्रकांत विरळीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (दि. 4) सकाळी सुनीताराणी बारामतीकर यांचा हजेरीचा कार्यक्रम पार पडून सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा आखाडा होईल. पिंपळाचीवाडी येथे सायंकाळी धुमधडाका हा बहारदार ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम पार पडणार आहे. शुक्रवारी (दि. 5) हजरत ख्वाजा यांचा जारदचा कार्यक्रम पार पडून, यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
भांडगाव येथे श्रीरोकडोबानाथसाहेबांच्या यात्रा उत्सवाला गुरुवारी (दि. 4 एप्रिल) सुरुवात होत आहे. सकाळी देवाला पोशाख कार्यक्रम पार पडला जाणार आहे. देवाचा महाभिषेक होणार आहे. सायंकाळी भजन, विविध खेळांचे डाव, छबिना, पालखी मिरवणूक पार पडून पै-पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी विठाबाई नारायणगावकर सह रोहित नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (दि. 5) सकाळी हजेरी, सायंकाळी निकाली कुस्त्यांचा आखाडा होत यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्याने यात्रा उत्सवातील तमाशाचे कार्यक्रम हे परवानगी घेऊनच व वेळेची मर्यादा पाळूनच पार पाडावे. नियमानुसार सर्व कार्यक्रम गावांना करावे लागणार आहेत.
– नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक, यवत.
हेही वाचा
Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी..!
Lok Sabha Election 2024 | रावेरमध्ये प्रतिष्ठेची लढत
धक्कादायक! ९ वर्षीय मुलाचे अपहरण; २३ लाखांची मागणी आणि खून
Latest Marathi News दौंडच्या ग्रामीण भागातील यात्रांची तयारी पूर्ण; बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईचे सावट Brought to You By : Bharat Live News Media.