कोल्हापूर : नाव मसाज सेंटरचे, बाजार देहविक्रीचा

कोल्हापूर : नाव मसाज सेंटरचे, बाजार देहविक्रीचा

दिलीप भिसे

कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असहाय युवती, महिला सावज शोधायचं, आर्थिक आमिष दाखवायचं अन् वाममार्गाला लावून त्यांच्या आयुष्याचा बाजार मांडायचा. त्यावर घसघशीत कमाई करणार्‍या टोळ्यांचा जिल्ह्यात गोरखधंदा वाढला आहे. शहरासह ग्रामीण भागात विशेष करून महामार्गावर बेधडक कुंटणखाने सुरू आहेत. लॉजेस, कॅफेमध्येही चोरी चोरी छुपके छुपके वेश्याअड्ड्यांचा सिलसिला सुरू आहे. उच्चभ्रू वसाहतीतही मसाज सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यांची चलती आहे. जणू देहविक्रीचा खुलेआम बाजारच सुरू आहे. (Kolhapur Crime)
तपास कागदावरच
राजारामपुरी येथील मध्यवर्ती आणि रात्रंदिवस वर्दळ असलेल्या मनपा शाळा क्रमांक 9 पासून हाकेच्या अंतरावर एका निवासी संकुलातील गाळ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणार्‍या वेश्या अड्ड्यांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने भांडाफोड करून व्यवस्थापक महिलेसह चारजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अड्ड्याची मालकीण फरार असली तरी असहाय युवती, महिलांना शरीरविक्री करण्यास प्रवृत्त करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची गरज आहे. पोलिसांसमोर अशा सराईत टोळ्यांचे आव्हान आहे. केवळ कागदावर तपास नको, अशी कोल्हापूरकरांची भावना आहे.
रॅकेट चालविणार्‍या किती म्होरक्यांवर कारवाई झाली ?
गतवर्षात शाहूपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरीसह गांधीनगर, गोकुळ शिरगाव परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत चालणार्‍या कुंटणखान्यांचा पर्दाफाश झाला. एजंटांना अटक झाली. पीडित महिलांची सुटका झाली. पण पुढे काय… तपास कागदावरच घुटमळला. वेश्या अड्ड्यांचे रॅकेट चालविणार्‍या किती म्होरक्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला, हा कळीचा अन् संशोधनाचा विषय आहे.
14 महिन्यांत 14 वेश्या अड्ड्यांवर छापे; 36 पीडितांची सुटका!
एक जानेवारी 2023 ते 25 मार्च 2024 या काळात जिल्ह्यात 14 वेश्या अड्ड्यांवर छापे टाकून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने 21 एजंटांना जेरबंद करून कोठडीत रवानगी केली आहे. 36 पीडित महिला, युवतींची सुटका करण्यात आली आहे. या काळात शाहूपुरी – 4, पन्हाळा – 2, जुना राजवाडा – 2, गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 2 अशा कारवाईंचा समावेश आहे. आर्थिक परिस्थिती आणि मजबुरीचा गैरफायदा घेत एजंटांनी पीडित महिलांना शरीरविक्रयास प्रवृत्त केल्याची माहिती चौकशीत निष्पन्न झाली आहे. (Kolhapur Crime)
Latest Marathi News कोल्हापूर : नाव मसाज सेंटरचे, बाजार देहविक्रीचा Brought to You By : Bharat Live News Media.