पुणे : खानापूर पुलाचे काम अर्धवट; पर्यटकांसह नागरिक त्रस्त
खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुणे -पानशेत रस्त्यावरील खानापूर-मणेरवाडी येथील पुलाचे काम तीन वर्षांपासून अर्धवट आहे. खड्डे, दगड-मातीत खचलेल्या पुलावरून पर्यटकांसह नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे या पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे. हायब्रीड अम्युनिटी योजनेअंतर्गत गडकोटांना जवळच्या अंतराने जोडण्यासाठी पुणे-पानशेत व इतर रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने सव्वादोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. नांदेड फाट्यापासून पानशेतपर्यंत रुंदीकरण करून रस्ता चकाचक केला आहे, त्यामुळे वाहने वेगाने धावत आहेत.
खानापूर-मणेरवाडी येथील मोठ्या ओढ्यावरील पुलाचे काम मात्र गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. अर्धवट पुलामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक वेळा पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्याने पुलासह रस्ता पाण्याखाली बुडला होता. सुदैवाने दुर्घटना घडल्या नाहीत, असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम पूर्ण केले नाही. ओढ्यात सिमेंट काँक्रीटचे स्लॅब उभे करून पूल उभारण्यात आला आहे.
मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती, कठडे, भराव टाकून पुलावर डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. पुलाचे काम करणार्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी केली आहे. खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर, सोनापूरचे माजी उपसरपंच विनोद पाबेकर आदींनी पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध नसेल, तर आम्ही लोकवर्गणीतून पुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
कामासाठी निधीचा अभाव
पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तीस ते चाळीस लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, एवढा निधी उपलब्ध नसल्याने पुलाचे काम रखडले असल्याचे चित्र पुढे आले आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना पूर परिस्थिती निर्माण होणार्या खानापूर पुलाचे काम पूर्ण करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.
– आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता,
हेही वाचा
दै Bharat Live News Media इम्पॅक्ट : मनपातर्फे संभाजी स्टेडीयमवर स्वच्छता अभियान सुरू
अदानी पोर्ट्सने ३ हजार ८० कोटीला आणखी एक बंदर घेतले विकत
मुलीचा हट्ट फळला; सहा वर्षांनंतर विभक्त पती-पत्नी पुन्हा एकत्र
Latest Marathi News पुणे : खानापूर पुलाचे काम अर्धवट; पर्यटकांसह नागरिक त्रस्त Brought to You By : Bharat Live News Media.