हॉटस्पॉट निश्चित करून डेंग्यूवर नियंत्रण मिळवू

हॉटस्पॉट निश्चित करून डेंग्यूवर नियंत्रण मिळवू

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जातील. डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याबाबतचा अहवाल आरोग्य अधिकाऱ्यांकडून घेऊन रोग नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जातील. डेंग्यू रुग्णांचा हॉटस्पॉट निश्चित करून उपाययोजना राबविल्या जातील. हा आजार तितका गंभीर नसून यावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.नूतन जिल्हाधिकारी म्हणून मोहम्मद रोशन यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकारांची ओळख करून घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण यापूर्वी सेवा बजावलेल्या हावेरी, उडुपी, मंगळूर आदी ठिकाणांचा अनुभव सांगितला. दरम्यान वाढत चाललेल्या डेंग्यू आजारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. यावर उपाययोजना राबविण्यासाठी सूचना केली आहे. त्यानुसार रोग नियंत्रणासाठी आद्यक्रम देण्यात येणार आहे.
आरोग्य खाते, जिल्हा पंचायत, ग्राम पंचायत यांच्या सहकार्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रा. पं. पातळीवर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक गावात पाण्याची चाचणी करण्यात येत आहे. शुद्ध पाणीपुरवठा घटक याबाबतची माहिती जाणून घेऊन ते पुन्हा पूर्वीप्रमाणे कार्यरत करण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. डेंग्यू आजाराचे निदान करण्यासाठी खासगी डॉक्टरांकडून शुल्क आकारले जात आहे, असे पत्रकारांनी विचारले असता यासाठी जिल्हा रुग्णालयातच व्यवस्था केली जाईल. प्रथम जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या, डेंग्यू तपासणीसाठी असणाऱ्या सुविधा यांचा आढावा घेऊन डेंग्यू आजाराचे निदान करण्यासाठी आणखी सुविधा पुरविल्या जातील. आरोग्य व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.